विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. या निकालामध्य एकीकडे त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची ठाकरे गटाची याचिका फेटाळली, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाची याचिकाही फेटाळून लावली आहे. त्यामुळे या निकालावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून निकालावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी या निकालावर बोलताना राहुल नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे.
काय निकाल दिला राहुल नार्वेकर यांनी?
राहुल नार्वेकरांनी बुधवारी बहुप्रतिक्षित निकाल दिला. या निकालात त्यांनी प्रामुख्याने ६ मुद्द्यांचा समावेश केला. हे मुद्दे म्हणजे…
१. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच.
२. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड योग्यच.
३. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड योग्यच.
४. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मनमानीपणे एकनाथ शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार नाही
५. सुनील प्रभूंचा व्हिप गैरलागू ठरल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.
६. शिंदे गटानं बजावलेल्या व्हिपमध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.
राहुल नार्वेकरांनी दिलेल्या या निकालामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेच्या कारवाईपासून संरक्षण मिळालं असलं, तरी शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी आता ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठाकरे गटानं केली आहे.
नितीन देशमुख यांची खोचक टीका
दरम्यान, एकीकडे ठाकरे गटानं पुढील लढ्यासाठी कंबर कसली असताना दुसरीकडे या निकालावर परखड टीकाही केली आहे. नितीन देशमुख यांनी एबीपी वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राहुल नार्वेकरांना खोचक शब्दांत लक्ष्य केलं आहे. “हा निकाल नार्वेकरांनी एवढा चांगला दिला की त्याचा आदर्श घ्यावा. नार्वेकरांना तर मी म्हणतो देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनवावं. म्हणजे देशातले चांगले चांगले निकाल नार्वेकर देतील.गाढवानं गाढवासारखाच निकाल दिला आहे हा. हे अपेक्षितच होतं. आता पुढची रणनीती पक्षप्रमुख ठरवतील”, असं नितीन देशमुख म्हणाले.
ठाकरे गटाचं भवितव्य काय?
दरम्यान, आता ठाकरे गटाचं भवितव्य काय? अशी विचारणा केली असता नितीन देशमुख यांनी त्याविषयी चिंता नसल्याचं नमूद केलं. “या निकालाचा आणि भवितव्याचा काही संबंध नाही. उद्धव ठाकरेंचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. पण राहुल नार्वेकरांचं भवितव्य खराब आहे. कारण निवडणुकीतच खरं भवितव्य समोर येईल. ६-७ महिने निवडणुकीला बाकी आहेत. या निवडणुकीत हे ४० आमदार तुम्हाला कुठेच दिसणार नाही. एकनाथ शिंदेंनी सभागृहात म्हटलं होतं की ४० पैकी एकही आमदार पडला, तर मी शेतात काम करायला जाईन. त्या शब्दावर त्यांनी ठाम राहावं”, असा टोला नितीन देशमुख यांनी लगावला आहे.
“सुरुवातीपासून पक्षप्रमुखच महाराष्ट्रात पक्षाच्या सभा घेत आले आहेत. या ४० लोकांनी कधी पक्षासाठी सभा घेतल्या नाहीत. एकनाथ शिंदे कधी विदर्भात प्रचाराला आले नाहीत. पक्षासाठी जिवाचं रान उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी केलं. महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी, आमच्यासाठी पक्षही ठाकरे, चिन्हही ठाकरे आणि नेतृत्वही ठाकरेच”, असा निर्धार नितीन देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.