महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून योजनेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम केले जात असताना दुसरीकडे विरोधी पक्षांकडून त्यावर परखड शब्दांत टीका केली जात आहे. १५ ऑगस्टला भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या मुलानं केलेलं लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं भाषण व्हायरल होत असताना त्यावरून ठाकरे गटानं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे.
“रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका महिला मेळाव्यात मुख्यमंत्री मिंधे हे महिलांना सारखे विचारत आहेत, “पैसे मिळाले ना? मिळाले ना पैसे? पैसे मिळाले ना?” यावर समोरच्या गर्दीतून एक महिला जोरात ओरडली, “होय होय, मिळाले. पैसे काय खोकेवाल्या सरकारच्या बापाचे आहेत काय?” महिलांच्या मनातला हा उद्रेक आहे”, असं सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
‘हा तर १५०० रुपयांत मतं मागण्याचा जंगी कार्यक्रम’
‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे १५०० रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता. लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व १५०० रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे’, अशा शब्दांत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
‘बहिणी-दीदींच्या सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही. बांगलादेशातील हिंदूंवरील, तेथील महिलांवरील अत्याचारांवर देशाचे गृहमंत्री भाष्य करतात. बांगलादेशातील हिंदूंची त्यांना चिंता वाटते, पण महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’वरील अत्याचार त्यांना अस्वस्थ करीत नाहीत. लाडके भाऊ बेरोजगार आहेत. त्यांना काय मिळणार? त्यांना कोण देणार?’ असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“महायुती सरकारकडे एक लाडका मुलगा…”
‘महायुतीत सरकारकडे एक लाडका मुलगा आहे व एक लाडकी मुलगी आहे. हा लाडका मुलगाच सध्या ‘वर्षा’ बंगल्यावरून राज्याच्या प्रशासनास धमक्या देत राज्य चालवीत आहे. निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोनेक महिने सगळेच लाडके होतील. या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत. बेरोजगार तरुणांना त्यांचे मोबाईल फोन रिचार्ज करणे कठीण झालेय. निदान लाडक्या बेरोजगारांसाठी फोन रिचार्जची योजना तरी सरकारने जाहीर करावी अशी गमतीशीर मागणी झाली आहे’, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, भुऱ्याच्या भाषणाच्या व्हायरल व्हिडीओवरूनही खोचक टीका करण्यात आली आहे. ‘जालन्याच्या भुऱ्याने ‘लाडकी बहीण’ योजनेवर स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे. भुऱ्याने आपल्या खास शैलीत भाषणात सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे ‘लाडके लेकरू’ अशी लहान मुलांसाठीही योजना सरकारने सुरू करावी. भुऱ्याने खरे तेच सांगितले. भुऱ्याला डोके आहे. त्यालादेखील ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ हवाच आहे. भुऱ्यादेखील डोक्यावर पडलेला नाही हे डोके नसलेल्या सरकारने लक्षात घ्यावे’, असा टोला ठाकरे गटानं राज्य सरकारला लगावला आहे.