मुंब्रा येथील शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंब्र्यातील शिवसेना शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आली आहे. त्याठिकाणी तात्पुरती नवीन कंटेनर शाखा सुरू करण्यात आली आहे. या शिवसेना शाखेवरून दोन्ही गटांत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत हे मुंब्र्यातील वादग्रस्त ठरलेल्या शाखेला भेट दिली आहे.
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे मुंब्र्यात दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही गट अशाप्रकारे आमने-सामने आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना संबंधित शिवसेना शाखेपर्यंत जाण्यापासून रोखलं. पोलिसांच्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे यांनी बॅरिकेड्सजवळून शाखेची पाहणी केली. या संपूर्ण प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.
हेही वाचा- “त्या नासक्याला सांगा…”; शिंदे गटाच्या नेत्यावर जितेंद्र आव्हाड भडकले, म्हणाले…
काल आम्ही बॅरिकेड्स तोडून आत शिरलो असतो, तर मोठा रक्तपात आणि दंगली उसळल्या असत्या. राज्यातील वातावरण खराब होऊ नये, म्हणून आम्ही आतमध्ये जाण्याचं टाळलं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…”, मुंब्र्यातील शाखेवरून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
मुंब्रा येथील शिवसेना शाखेवरून सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “जर आम्ही ठरवलं असतं तर काल (शनिवार, ११ नोव्हेंबर) त्या शाखेचा ताबा घेतला असता. आम्ही आतमध्ये घुसू शकलो असतो. पण सध्या दिवाळी सुरू आहे. आम्ही राज्यातील वातावरण बिघडवू इच्छित नाही. आमच्यासमोर बेईमान आणि गद्दार लोक आहेत. जेव्हा गद्दारांच्या हातात सत्ता जाते. तेव्हा त्यांचा रावण, कंसमामा बनतो. आम्ही काल आतमध्ये शिरू शकलो असतो. तेथील वातावरण कसं होतं? हे तुम्हीही पाहिलं असेल. आम्ही आत शिरलो नाही, कारण रक्तपात घडला असता, दंगली घडल्या असत्या, त्यामुळे आम्ही ते टाळलं.”