मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. राहुल नार्वेकर सुनावणीस मुद्दाम विलंब करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने केला होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. एका आठवड्याच्या आत सुनावणी घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी सुनावणी सुरू केली.
पण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘घाना’ देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. ते घाना देशात ६६ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत उपस्थित राहणार होते. तेथे जागतिक संसदीय लोकशाही, राजकीय प्रश्नांवर विचारमंथन होणार असून विधानसभा अध्यक्ष तेथे लोकशाहीवरील चर्चेत सहभागी होणार होते. पण आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे. या सर्व घडामोडीनंतर ‘सामना’च्या अग्रलेखातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
“आपले स्पीकरसाहेब घानाच्या भूमीवर निघाले आहेत ते जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी. त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांचे स्वागत घानात होणार आहे काय? लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे. लोकशाहीचा खून करून लोकशाही कल्याणाची प्रवचने झोडणे म्हणजे इदी अमिनने मानवतेवर चर्चा करण्यासारखेच आहे,” अशी टीका ‘सामना’ वृत्तपत्रातून केली आहे.
हेही वाचा- “अजित पवारांनी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर…”, गुणरत्न सदावर्तेंचं विधान
“दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांना अपात्र व्हावेच लागेल. हा मृत्यू अटळ आहे. मात्र आजचे मरण उद्यावर ढकलत ते वर्षभर पुढे ढकलले गेले आहे. त्यात देशाची लोकशाही व संविधानाची हत्या दिवसाढवळ्या झाली आहे. स्पीकरसाहेब म्हणतात, ‘‘मी घाईघाईने निर्णय घेणार नाही.’’ घाईघाईने निर्णय घेणार नाही याचा अर्थ कधीच निर्णय घेणार नाही किंवा मनमर्जीप्रमाणे निर्णय घेईन असे ना,” असंही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.