राज्याच्या राजकारणात सध्या ललित पाटील प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोधकांनी ललित पाटील फरार होण्याच्या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं असताना तो शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातही ललित पाटीलवरून दावे-प्रतिदावे होत असतानाच नाशिकच्या गिरणा नदीत कोट्यवधींचं ड्रग्ज सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय राऊत?

“हजारो कोटींचं ड्रग्ज गुजरातमधून महाराष्ट्रात कसं येतं? त्यांना कुणाचं संरक्षण आहे? अर्धा ग्रॅम ड्रग्ज सापडल्यावर हे आकांडतांडव करतात. पण देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही असून इथे ५०० कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. जे यातून सुटलं, ते मुलांकडे, कॉलेजमध्ये, महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. उडता पंजाब, उडता गुजरात झाल्यानंतर आता महाराष्ट्राला केनिया, नायजेरियाच्या दिशेनं घेऊन जात आहात का? इथून मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला गेले. तिथून काय येतंय? तर ड्रग्ज. या ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायला हवा. आम्ही ते करू. जे होईल, ते बघू”, असं संजय राऊत म्हणाले.

“श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल”

दरम्यान, संजय राऊतांनी यावेळी फडणवीसांच्या एका विधानाचा संदर्भ घेऊन त्यांना लक्ष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांना सध्या फार कंठ फुटला आहे. ते एका गरब्यात गेले आणि त्यांनी गर्जना केली की ‘देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा’. मग कधी बोलत नव्हता? जो बच्चा श्रीराम म्हणतोय, त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचतंय. त्याचा बंदोबस्त करा. पंचवटी रामाचंच ना? त्या नाशिकमधल्या पंचवटीत ड्रग्जचा सर्वात जास्त व्यापार चालू आहे. हे फडणवीसांना माहिती आहे का? पैठण तीर्थक्षेत्र आहे. तिथे काल अडीचशे-तीनशे कोटींचं ड्रग्ज सापडलं. आपका ड्रग्ज लेके बच्चा बच्चा श्रीराम नहीं बोलेगा. तुरुंगातून ड्रग्जमाफियांना पळवून लावलं जातंय आणि तुम्ही काय सांगताय की जय श्रीरामच्या घोषणा द्या. श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल”, असं संजय राऊत म्हणाले.

विश्लेषण : ससून अमली पदार्थ प्रकरण काय आहे? तस्कर ललित पाटीलचे नेमके काय झाले?

मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं. “शिवसेनेचा एकच दसरा मेळावा आहे. इतर मेळावे होत असतात. बाडगा जरा मोठ्यानं बांग देत असतो. नपुंसक जास्त कांदे खात असतो. हात पसरवून बाळासाहेबांच्या बरोबर फोटो लागले आहेत त्यांचे. पोटात कळ आल्यासारखा चेहरा केलाय फोटोत. लगेच जायचंय अशा हावभावाचा. बाळासाहेबांबरोबर असे फोटो लावण्याची आमची किंवा उद्धव ठाकरेंची कधी हिंमत झाली नाही. आम्ही शिवसेनेचे मालक नाही आहोत. आम्ही शिवसेनेचे विश्वस्त आहोत. हात पसरवून तुम्ही फडफड दाखवलीये, ती शेवटची आहे. तुमचा पुढचा दसरा मेळावा होणार नाही. तुम्ही डुप्लिकेट लोक आहात. हा डुप्लिकेट मेळावा आहे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction sanjay raut slams cm eknath shinde dcm devendra fadnavis pmw