लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना देशभरात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकीकडे आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू असताना दुसरीकडे दोन्ही बाजूला उमेदवारांची व मताच्या गणितांची जुळवाजुळवही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशात विरोधी पक्षांवर ईडीकडून सूडाच्या भावनेतून कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. ठाकरे गटाकडून असाच आरोप सत्ताधारी भाजपावर करण्यात आला आहे. “भाजपाच्या गटारगंगेत उड्या मारताच आरोप असलेले नेते पवित्र झाले”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
मोदी-शाहांवर खोचक टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सामना अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे. “सत्यवचनी प्रभू श्रीराम मोदी-शहांच्या सरकारला सुबुद्धी देतील असे वाटले होते, पण ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार?’ या उक्तीप्रमाणे सध्या या सरकारचा कारभार चालला आहे. भजन रामाचे व कृती रावणाची हेच मोदी-शहा सरकारचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांना नामोहरम करायचे व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूट गैरवापर करायचा हाच या सरकारचा उद्योग”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
“फडणवीसांचा खुलास म्हणजे शहाजोगपणाचा उत्तम नमुना”
“रोहित पवार यांच्या कंपन्यांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले. देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची प्रतिक्रिया मनोरंजक व राजकीय विश्लेषकांनी अभ्यास करावी अशी आहे. फडणवीस म्हणतात, ‘रोहित पवारांवर छापा पडला की नाही हे माहीत नाही. मात्र पवार हे व्यावसायिक असून व्यवसायात असे प्रकार होत असतात. त्यांनी काहीच केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही’. फडणवीस यांचा हा खुलासा म्हणजे शहाजोगपणाचा उत्तम नमुना आहे”, असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला आहे.
“अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी व्यवसायात आहेत व त्यांच्या व्यवसायाचे रहस्य ईडीनेच उघड केले. शेवटी या सगळ्यांनी भाजपाच्या गटारगंगेत उड्या मारताच ते पवित्र झाले. आता छापे वगैरे बंद झाले”, असंही ठाकरे गटाकडून मांडण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचा ईडीला इशारा!
“या सगळ्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे व ईडी-सीबीआयचे महत्त्व कमी झाले आहे. अर्थात ईडीने धमक्या दिल्या तरी आता लोक घाबरणार नाहीत. ‘ईडी’ त्यांच्या मालकांचे आदेश पाळते, पण लवकरच मालक बदलणार आहेत. त्यामुळे हे मालक व त्यांचे चुकीचे आदेश पाळणारे ‘ईडी’ वगैरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे”, असा इशाराच ठाकरे गटानं ईडीला दिला आहे.