उल्हासनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकरणाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस स्थानकातच गोळीबार केल्यामुळे राज्यातल्या कायदा व सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच, सत्ताधारी गटातल्याच दोन पक्षांतील महत्त्वाचे सदस्य या गुन्ह्यात गुंतले असल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाकडून टीकास्र सोडण्यात आलं आहे. तसेच, आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पूर्वमधील भाजपाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. शिंदे गटाचे दोन पदाधिकारीही या प्रकारात जखमी झाले. आता गणपत गायकवाड अटकेत आहेत. या संपूर्ण प्रकारावर सामनातील अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावण्यात आला आहे.

“महाराष्ट्रात ‘मिर्झापुरी राजकारण’ घडतंय, याचे सूत्रधार…”

“महाराष्ट्रात पोलीस ठाणीही सुरक्षित नसतील तर मग काहीच सुरक्षित नाही. कायदा आणि सुव्यवस्था गुंडांच्या अड्ड्यावर कचरा काढत आहे. पोलीस ठाण्यांवरच हल्ले करणे, पोलीसप्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश, बिहारात अनेकदा घडते. आता हे प्रकार महाराष्ट्रात घडू लागले व या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत”, अशा शब्दांत ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

“त्या मिंध्याला कुठूनही खेचून आणला असता, पण…”, आमदार फुटीवर उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया

“बिगर भाजपशासित राज्यात मुंगी पादली तरी या मंडळींची प्रतिक्रिया येते, पण महाराष्ट्रात शहा-मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी, रक्तपात सुरू आहे. त्यावर हे ‘संस्कार भारती’ तोंड उघडायला तयार नाहीत”, अशा शब्दांत अग्रलेखातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

“पुण्यात अजितदादांच्या कृपेनं जे घडतंय, ते बेशरमपणाचं लक्षण आहे”

“पुण्यनगरीत तर अजितदादांच्या कृपेने जे घडते आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बेशरमपणाचे लक्षण आहे. पार्थ पवार यांनी कुख्यात गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली व ‘विचारांची देवाणघेवाण’ केली. गेल्या चार महिन्यांत पुण्यातील अनेक खतरनाक गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला. कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील पाच जणांच्या बाबतीत आरोपपत्र दाखल करण्यास जाणूनबुजून विलंब केला गेला. त्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झाला. हे चित्र चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरूच आहे”, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

“भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोटय़वधी रुपये पडले आहेत. गायकवाड यांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक झाली पाहिजे. ‘ईडी’ने गायकवाड यांचा जबाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे. ‘ईडी’वाल्यांनो, ऐकताय ना? ऐकले असेल तर ‘वर्षा’ बंगल्यावर समन्स पाठवा”, असा टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slams cm ekanath shinde ajit pawar on ganpat gaikwad firing case pmw
Show comments