राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर कामकाज स्थगित झालं असलं, तरी त्यानंतर विधिमंडळाच्या बाहेर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधूनही हेच चित्र दिसून आलं. सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. तसेच, राज्य सरकारला नामुष्कीची चिंता सतावते आहे का? असा सवालही केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना कामकाजात समन्वय ठेवण्याचा सल्ला दिल्याचं ठाकरे गटानं नमूद केलं आहे. सामना अग्रलेखातून या मुद्द्यावर भाष्य करतानाच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील अंतर्गत राजकारणावरही ठाकरे गटानं बोट ठेवलं आहे.
“विरोधकांकडे सरकारविरोधात भरपूर दारूगोळा”
“सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या मंत्र्यांना हा सल्ला दिला असेलही, पण मंत्र्यांना असे बजावण्याची वेळ त्यांच्यावर का यावी? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जाहीरपणे सहकारी मंत्र्यांचे कान का टोचावे लागले? याही अधिवेशनात विरोधकांकडून तुफानी हल्ले सरकारवर होणार आहेत, सरकारविरोधात विरोधी पक्षांकडे भरपूर दारूगोळा आहे आणि त्याच्या माऱ्यापुढे मंत्री टिकाव धरू शकणार नाहीत, अशी भीती तुम्हाला वाटत आहे का? मंत्र्यांची उडणारी त्रेधातिरपीट तुम्हाला आधीच जाणवते आहे का?” असा खोचक सवाल ठाकरे गटानं केला आहे.
“तुमचा मंत्र्यांच्या वकुबावर विश्वास नाही”
“सरकारला आणखी एक ‘इंजिन’ आणि ‘काही डबे’ जोडले गेले आहेत. तेव्हा अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याने काही ‘डबे’ रुळावरून घसरण्याची नामुष्की याही वेळेस ओढवली तर काय? त्यातूनही कदाचित मंत्र्यांना सावध केले गेले असावे. “अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग नीट घ्या, अधिकाऱ्यांनी दिशाभूल करणारी माहिती देण्याचा प्रकार खपवून घेऊ नका, असे मंत्र्यांना बजावले गेले आहे. याचा एक अर्थ तुमचा तुमच्या मंत्र्यांच्या वकुबावर विश्वास नाही आणि दुसरा अर्थ प्रशासनाकडून दगाफटका होण्याची भीती तुम्हाला आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“या तिन्ही पक्षांत प्रत्येकी एक ‘भावी मुख्यमंत्री’ दडलेला आहे. या सरकारमध्ये आधीच एक उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या जोडीला आणखी एक ‘उप’ आणून बसवला गेला. राजकीय तडजोडीचा तसेच समन्वय आणि विश्वासाच्या अभावाचा आणखी मोठा पुरावा दुसरा कोणता असू शकतो?” असा सवालही ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.