नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयांत मोठ्या संख्येनं रुग्णमृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून रान उठवायला सुरुवात केली आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून कोविड काळातील कथित घोटाळ्यावरून आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत नक्षलवादासंदर्भातील बैठकीसाठी गेले असताना ठाकरे गटानं शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुख्यमंत्र्यांच्या पायजम्याची नाडी…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री महोदयांचे बूड महाराष्ट्रात टिकत नाही व ते सतत दिल्लीस पळत आहेत. पालकमंत्री कुणाला नेमायचे, महामंडळांचे वाटप कसे करायचे, असे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री ऊठसूट दिल्ली वाऱ्या करतात. स्वाभिमानासाठी पक्षत्याग करणाऱ्यांचे हे असे हाल सुरू आहेत. दिल्लीने ‘ऊठ’ म्हटले की उठायचे व ‘बस’ म्हटले की बसायचे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पायजम्याची नाडी दिल्लीच्या हातात आहे. त्यामुळे शिवसेना या महाराष्ट्र अभिमानी पक्षाचे नाव त्यांनी धुळीस मिळविले आहे”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.

“मी बेकायदेशीर? मग माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर…”, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला…

“आता फक्त ‘मोदी मोदी-शहा शहा’चा गजर सुरू आहे. उद्या ते शिवसेनेची स्थापना मोदींमुळे झाली, मोदींचीच शिवसेना खरी असे बोलायलाही कमी करणार नाहीत. भाजपने शिवसेनेशी उभा दावा मांडला व त्यासाठी शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांना हाताशी धरले ते यासाठीच”, अशा शब्दांत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

“पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते”

“अजित पवार त्यांच्या गटाच्या खुशामतखोरीत खूश आहेत. शिंदे त्यांचा गट सांभाळत बसले आहेत. देवेंद्रभाऊ या दोघांना नाचवीत, त्यांचे डमरू वाजवीत आहेत व महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान चालले आहे. महाराष्ट्राची सुखचैन, शांतता अधोगतीस गेली आहे. सोन्यासारखे राज्य खचून गेलेले दिसत आहे. पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते असे एकदा दादा धर्माधिकारी म्हणाले होते. महाराष्ट्राच्या बाबतीत ते खरे ठरले आहे”, अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.

“राज्यात तणावाच्या स्थितीत ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री. लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसले आहेत”, असं टीकास्र ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सोडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slams cm eknath shinde devendra fadnavis ajit pawar pmw
Show comments