Shivaji Maharaj Waghnakh in Satara: राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी राजकीय नेतेमंडळी सोडताना दिसत नाहीत. त्यातच, राज्य सरकारनं लंडनमधील म्युझियममध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणली. साताऱ्यात ठेवली. पण ती शिवाजी महाराजांचीच आहेत का? असा प्रश्न काही इतिहासकार व विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
वाघनखांच्या सत्यतेबाबत शंका नसून ती छत्रपती शिवाजी महाराज यांनीच वापरली आहेत की नाही? हा प्रश्न आहे, असा मुद्दा सामना अग्रलेखातून मांडण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकार आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वाघनखांचं राजकारण करत असल्याची टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“पराभवामुळे मोदींनी भगवान जगन्नाथाचं नामस्मरण सुरू केलं”
“बऱ्याच वर्षांपूर्वी शिवरायांची भवानी तलवार इंग्लंडच्या राणीच्या म्युझियममधून महाराष्ट्रात आणायचा प्रचारकी जुमला झालाच होता. आता मिंधे-फडणवीसांनी वाघनखांचा वापर सुरू केला. मोदी व त्यांच्या लोकांनी मागच्या निवडणुकीत शिवरायांचा वापर केला. शिवरायांच्या बरोबरीने मोदींचे फोटो छापले. त्यानंतर मोदी हे विष्णूचे अवतार बनले व प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाचे बोट धरून ते रामास अयोध्येतील नव्या मंदिरात घेऊन जात आहेत, अशी पोस्टर्स झळकली; पण अयोध्येतच मोदींचा पराभव झाल्याने मोदी यांनी राजकीय यश मिळालेल्या ओडिशातील भगवान जगन्नाथाचे नामस्मरण सुरू केले. शिवराय व श्रीराम मागे पडले”, अशा शब्दांत ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.
“चोरांचे सरकार व नकली सरदार म्हणतील तीच वाघनखे खरी हे मान्य करता येणार नाही. मिंधे व फडणवीस या दुकलीने महाराष्ट्राचा इतिहास पिसाळ-खोपड्यांच्या मानसिकतेने मांडायला घेतला आहे. त्यामुळे त्यांना कावळ्यांना मोर व कोल्ह्यांना वाघ ठरविण्याची घाई झाली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पोटात वाघनखे खुपसल्याने त्यांचे विव्हळणे संपलेले नाही”, असा टोला अग्रलेखातून विद्यमान राज्य सरकारला लगावण्यात आला आहे.
“…त्यात मिंधे-फडणवीसांना झोंबायचं काय कारण?”
“मुळात वाघनखे नकली असे कोणीच म्हणत नाही, पण ‘चोरांच्या मनात चांदणे’ तसे मिंधे-फडणवीसांचे झाले आहे! ही वाघनखे खरेच शिवरायांनी वापरलेली आहेत काय? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकांनी विचारला व सावंत यांनी त्यांच्या शंकेला पूरक असे पुरावे लोकांसमोर मांडले. त्यात मिंधे-फडणवीस यांना मिरच्या झेंबायचे कारण काय?” असा प्रश्न ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“सरकार साधं डोकं खाजवायलाही तयार नाही”
“गुजरातचे व्यापारी राज्यकर्ते आज मुंबई-महाराष्ट्र लुटत असताना मिंधे-फडणवीस त्यांच्या बोटांच्या नखांनी साधे डोके खाजवायला तयार नाहीत, तेथे यांनी शिवरायांच्या वाघनखांवर बोलावे हे गमतीतेच आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई गुजरातच्या उद्योगपतींना आंदण दिली जात असतानाही ज्यांच्या बोटांची नखे शिवशिवत नाहीत ते आता वाघनखांवर प्रवचने झोडत आहेत”, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.