राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट आणि अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील होण्याचा घेतलेला निर्णय यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. त्यानंतर खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा झडली. शुक्रवारी अखेर खातेवाटपाला मुहूर्त सापडला. यामध्ये शिंदे गट व भाजपाकडची काही खाती अजित पवार गटाला देण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्याकडचं कृषी खातं काढून घेण्यात आलं. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार गटाशी केलेली युती म्हणजे कूटनीती व बेरजेच्या राजकारणाचा भाग असल्याचं म्हटलं. यावरून आता सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं हल्लाबोल केला आहे. या भाषणांचा उल्लेख ‘दोन वांझ भाषणे’ असा करत टीकास्र सोडलं.
“फडणवीसांना जुनं काही आठवत नाही असं दिसतं”
“ठाणे जिल्हय़ात काल दोन भाषणे झाली. दोन्ही भाषणांत ढोंग व खोटेपणाचा ‘कूट’ होता. त्यातील एक भाषण फडणवीस यांचे होते. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, ‘सध्या राष्ट्रवादी काँग्रेसशी म्हणजे अजित पवार गटाशी झालेली युती ही कूटनीती आहे, अधर्म नव्हे.’ भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती राजकारणात वापरावी लागते, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांना झाले आहे तरी काय? मुख्यमंत्री मिंधे यांच्या संगतीत आल्यापासून त्यांनी सत्य व नीतिमत्तेची कास सोडली आहे. त्यांना जुने काही आठवत नाही असेच एकंदरीत दिसत आहे”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
“गजकर्ण झाले की अशा बेरजा सुचतात”
“तिकडे मुख्यमंत्री शिंदेही आपल्या मिंध्या कार्यकर्त्यांना म्हणाले, राष्ट्रवादीचे सोबत येणे हे बेरजेचे राजकारण आहे. माणसाला गजकर्ण झाले की अशा बेरजा सुचतात. ‘थुंकलेले चाटणे’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. बेरजेचे राजकारण वगैरे वल्गना करणाऱ्यांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही ठाकरे गटानं टोला लगावला आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी अजित पवार दाखल, नेमकं कारण काय?
“देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी महाराष्ट्रात वजन होते. त्यांचे बोलणे काही प्रमाणात गांभीर्याने घेतले जात होते. त्यांचे चित्त तेव्हा स्थिर होते. मनही शांत होते, पण २०१९ सालापासून त्यांची मनःशांती, संयम वगैरे साफ ढळला आहे”, अशी खोचक टीका ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
“शिंदे-फडणवीसांना मानसोपचार रुग्णालयात उपचारांची गरज”
“शिंदे-फडणवीस या जोडीचे डोके ठिकाणावर नाही व दोघांना ठाण्यातल्या मानसोपचार इस्पितळातील उपचाराची गरज आहे. फडणवीस हे अलीकडे वारंवार दुतोंडीपणा करीत आहेत. राजकारणात कोणताच पक्ष हा कायमचा अस्पृश्य नसतो असे म्हणतात, पण ‘एकवेळ मी अविवाहित राहीन, पण राष्ट्रवादीशी कदापि युती करणार नाही,’ हा ‘ठेका’ फडणवीस यांनी अलीकडेच धरला होता. आज त्याच राष्ट्रवादीसोबत त्यांनी ‘फेर’ धरला आहे”, अशीही टिप्पणी अग्रलेखात केली आहे.