लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणूक रोखे प्रकरण चांगलंच गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारची ही पूर्ण योजनाच घटनाविरोधी ठरवून बासनात गुंडाळली. शिवाय २०१९ पासून फेब्रुवारी २०२४ पर्यंत कोणत्या उद्योगपतीनं किती किमतीचे निवडणूक रोखे खरेदी केले होते आणि ते कोणत्या पक्षाला दिले याची सगळी माहिती जाहीर करण्याचे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे देणग्यांचं हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असताना आता महाराष्ट्रातील राजभवनावरच ठाकरे गटाकडून यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या केंद्रस्थानी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आहेत!
“कोश्यारींनी अंबानींकडून १५ कोटी रुपये घेतले, पण…”
“भगतसिंह कोश्यारींनी राजभवन हा भाजपचा राजकीय अड्डा बनवला. अनेक बेकायदेशीर कृत्ये तेथे चालवली गेली. त्यांना मिळालेल्या १५ कोटी रुपयांच्या देणगीचे प्रकरण आता समोर आले आहे. माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी माजी राज्यपालांचा भ्रष्ट कारनामा उघड केला. राज्यपाल असताना कोश्यारी यांनी उत्तराखंडमधील आपल्या एका संस्थेच्या नावावर मुंबईतील उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वसूल केल्या. त्यात सगळ्यात मोठे देणगीदार अंबानी असून कोश्यारी यांनी १५ कोटी रुपये अंबानींकडून घेतले, पण सामाजिक कार्याच्या नावाखाली घेतलेल्या या देणग्यांचा वापर वेगळ्याच कामासाठी झाला”, असा थेट आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
“कोश्यारींनी पुतण्याला रिसॉर्ट बांधून दिलं”
भगतसिंह कोश्यारींनी मुंबईतून घेतलेल्या देणग्यांमधून त्यांच्या पुतण्याला रिसॉर्ट बांधून दिल्यायचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. “राजभवनात या काळात अनेक पुरस्कार वितरण सोहळे पार पडले. या पुरस्कारांच्या सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात ‘व्यापार’ झाल्याची वदंता तेव्हा सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे अनेक पुढारी त्या काळात राजभवनातच चटया अंथरून बसत”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
विश्लेषण: सार्वत्रिक निवडणुका भारतीय लोकशाहीची ओळख कशा ठरल्या?
“सामाजिक कार्यासाठी मिळालेला पैसा ‘अय्याशी’वर उधळला व त्यात राजभवनाचा गैरवापर झाला. त्याबद्दल महाराष्ट्राचे पोलीस, फडणवीसांचे गृहखाते, ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा काय कारवाई करणार?” असा सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“राजभवनाचा वापर कोश्यारींच्या काळात दगडी चाळीप्रमाणे”
“राज्यपाल कोश्यारी यांचे एक पुतणे त्या काळात राजभवनात सर्व व्यवहार पाहत होते. राज्यपालांचा वापर करून त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाकडून लूट केली. या लुटीची नोंद राजभवनात आहे काय? राजभवनाचा वापर कोश्यारी काळात दगडी चाळीप्रमाणे झाला व भाजपचे पुढारी हे सर्व अनैतिक काम उघड्या डोळ्यांनी पाहत होते. भाजपला गैरमार्गाने पैसे जमा करण्याचे व्यसन जडले आहे, पण अशा वसुलीत घटनात्मक पदावरील व्यक्तींना वापरले जाणे हे चुकीचे आहे”, असा आक्षेप ठाकरे गटानं नोंदवला आहे.