एकीकडे देशाच्या संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे देशभरातील विरोधी पक्ष त्या त्या राज्यांमध्ये सत्ताधारी भाजपावर टीका करताना दिसत आहेत. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केले जात आहेत. यामुळे देशातील लोकशाहीच धोक्यात आल्याची टीकाही विरोधक करताना दिसत आहेत. यासंदर्भात ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी नुकत्याच केलेल्या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे. त्या विधानावरून ठाकरे गटानं हरीश साळवेंना लक्ष्य केलं आहे.
नेमकं काय झालं?
सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं हरीश साळवेंच्या विधानाचा संदर्भ देण्यात आला आहे. “हिंदुस्थान हा आर्थिक महासत्ता झालेला शेजारच्या चीनसारख्या राष्ट्रांना बघवत नाही. हिंदुस्थानचा चीनशी थेट आर्थिक संघर्ष आहे. देशाची आर्थिक प्रगती त्यांना बघवत नाही. त्यामुळे हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातो. हिंदुस्थानातच उभे राहून हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातोय, हीच लोकशाही देशात जिवंत असल्याची निशाणी”, असं साळवे यांनी म्हटल्याचं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
“साळवे ‘साम्राज्या’चे वकील आहेत”
या विधानावरून हरीश साळवेंवर सूचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. “कायदेपंडित साळवे यांनी आता आरोप केला आहे की, हिंदुस्थानात लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा मृत्यू झाला असल्याचा भ्रम हा आपल्याच देशातून पसरवला जात आहे. देशाची प्रगती रोखण्यासाठी हे सर्व घडवले जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. साळवे हे ‘साम्राज्या’चे वकील आहेत. आपल्या देशातील अनेक कॉर्पोरेट्स, बड्या उद्योगपतींचे ते कायदेशीर सल्लागार आहेत”, असं यात म्हटलं आहे. हरीश साळवे ब्रिटनच्या राजघराण्याचे वकील असल्याचंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
“साळवेंनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात एक विधान केले. ते नेमके वेगळे व या विधानाच्या विरुद्ध टोकाचे होते. ‘अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ‘ईडी’ला मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात येऊ नये म्हणून त्याला लगाम घालायलाच हवा.’ साळवे यांचे हे मत आपल्या देशात सुरू असलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात आहे”, अशी आठवण ठाकरे गटान करून दिली आहे.
“…हे या महान देशाचं दुर्दैव आहे”
राहुल गांधी मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात हायकोर्टावर केलेले भाष्य साळवे यांच्या डोळ्यांखालून गेलेच असेल. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द व्हावी याच एकमेव उद्देशाने संपूर्ण खटला चालवून त्यासाठीच न्यायदान झाले. ही एका संसद सदस्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपी नाही तर काय? सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आधी ‘ईडी’ लावायची व मग त्यांना पक्षात घेऊन मंत्री करायचे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे; पण हा स्वैराचार म्हणजे लोकशाहीची हत्या नव्हे, असे इंग्लंड वगैरे ठिकाणी बसलेल्या आपल्या विद्वानांना वाटणे हे या महान देशाचे दुर्दैव आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं हरीश साळवेंना लक्ष्य केलं आहे.