लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता असून त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षानं नुकतीच त्यांची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीवरून सध्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नितीन गडकरींचं नाव यादीत नसल्यामुळे टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नितीन गडकरींना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
“मोदी-शाहांपुढे न झुकणारा एकमेव भाजपा नेता म्हणजे…”
“मंत्रिमंडळात व भाजपमध्ये मोदी-शहांच्या टगेगिरीपुढे न झुकणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी. अशा गडकरींचे आव्हान म्हणा की भीती, ही मोदी-शहांच्या व्यापार मंडळास वाटणारच. त्याच भीतीमुळे २०२४ च्या निवडणुकीतून नितीन गडकरींना डावलायचे असे ठरवलेले दिसते”, अशी टिप्पणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“…तर भाजपमध्येच बंड होईल”
दरम्यान, या अग्रलेखात भारतीय जनता पक्षामध्ये बंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. “२०२४ साली पक्षात कोणाचेही आव्हान असू नये व गडकरी हे आव्हान ठरू शकतात. भाजपचा खेळ २३०-२३५ वर आटोपला तर भाजपमध्येच बंड होईल आणि मोदी-शहांना वगळता भाजपचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला तर नितीन गडकरी यांच्या नावास सर्वमान्यता मिळेल, या एकाच भीतीने गडकरी यांचा पत्ता आताच कट करण्याचा डाव दिसतो आहे”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क
“२०२४ च्या निवडणुकीनंतरचे दिल्लीतील राजकीय चित्र अस्थिर असेल व त्या अस्थिरतेच्या काळात सर्वच पक्षांना मान्य ठरतील असे गडकरी दिल्लीत नकोत हा साधा हिशेब दिसतो. गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळू नये म्हणून तेव्हा भाजपमध्ये गलिच्छ राजकारण झाले. गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष झाले असते तर राष्ट्रीय राजकारणात मोदी-शहांचा उदय झाला नसता. गडकरींच्या जागी राजनाथ सिंह भाजपचे अध्यक्ष झाले व त्यांनी मोदी हे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असे जाहीर केले”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ठाकरे गटाकडून लक्ष्य करण्यात आले आहे.
“गडकरी यांना उमेदवारी नाकारली तर नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवार बनवले जाईल व फडणवीसही मोठ्या हौसेने नागपुरातील नवरदेव म्हणून घोड्यावर बसतील”, अशी शक्यता ठाकरे गटानं वर्तवली आहे.