अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातून अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. राम मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण व्हायचं असलं, तरी या निमित्ताने देशभरात रामनामाचा गजर ऐकायला मिळाला. या पार्श्वभूमीवर सोहळ्याच्या निमित्ताने आता राजकीय चर्चाही पाहायला मिळत असताना दुसरीकडे ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने अयोध्या सोहळ्यावर टीकास्र सोडलं आहे. “बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी हे जंगल पेटवून दिलं असतं”, अशी टिप्पणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“श्रीरामांना घर मिळाले, पण…”
ठाकरे गटानं अयोध्येतील सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर हल्लाबोल केला आहे. “देशात रामराज्य आले आहे काय? श्रीरामांना घर मिळाले, पण देशातील लाखो लोक बेघर आणि उपाशी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामांसाठी उपवास धरला, पण देशातील कोट्यवधी जनतेची उपासमार दूर व्हावी यासाठी ते उपवास करणार आहेत काय? रामाचे नाव घेऊन देशाला फक्त ‘मोदी मोदी’ करायला लावणे हाच अयोध्या उत्सवाचा भाजपाई उद्देश असावा व या ढोंगबाजीचा मुखवटा उतरवण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख हवेच होते”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आलं आहे.
“बाळासाहेब ठाकरे हे या भूतलावर जन्मलेले असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अल्बर्ट आइनस्टाईन महात्मा गांधींविषयी जे म्हणाले होते, तेच वेगळ्या शब्दांत बाळासाहेब ठाकरेंविषयी म्हणावे लागेल. आइनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते, ‘येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता.’ गांधींच्या अनेक विचारांशी आणि भूमिकांशी शिवसेनाप्रमुख सहमत नव्हते. ते लोकशाहीपेक्षा शिवरायांच्या शिवशाहीवर विश्वास ठेवणारे होते.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानचा जळफळाट; प्रसिद्धी पत्रकात म्हटले, “भारतीय मुस्लीम..”
“…तर बाळासाहेबांनी हे जंगल पेटवलं असतं”
“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदूंची सुंता झाली असती. काशी-मथुरेच्या मशिदी झाल्या असत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मराठी माणूस कायमचा गुलाम झाला असता. मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पडला असता. महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीमोल झाला असता. हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धर्मांधता नाही, असा विचार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. पण देश ‘राममय’ करताना त्या हिंदुत्वात धर्मांधतेची अफू मिसळली जात असेल तर हा महान भारत देश पुन्हा जंगलयुगात जाईल. देशाचे जंगल होताना पाहणे दुर्दैव आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ते जंगलच पेटवले असते”, अशी टिप्पणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.