देशातील लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना अद्याप काही महिन्यांचा अवकाश आहे. मात्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभांमधून काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. इंडिया आघाडीवर त्यांनी घराणेशाहीचा आरोप करताना हे पक्ष म्हणजे प्रायव्हेट कंपनी असल्याचा टोला लगावला. त्यावरून आता ठाकरे गटानं पंतप्रधान मोदींसह भाजपाला लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले मोदी?
“घराणेशाही पक्ष हे फक्त स्वत:च्या कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत. पण भाजपाला मात्र देशातल्या सामान्य नागरिकांची काळजी आहे”, असं ते म्हणाले. “हे सर्व पक्ष म्हणजे प्रायव्हेट कंपनी झाले आहेत”, असा टोलाही मोदींनी लगावला. या मुद्द्यावरून आता ठाकरे गटानं सामना अग्रलेखातून मोदींवर व भारतीय जनता पक्षावर टीकास्र सोडलं आहे.
“…पण मोदींचा धर्म वेगळा आहे”
“मोदींनी राजकीय घराण्यांना ‘प्रायव्हेट कंपनी’ म्हटले. पण यातील बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या भाजपाने चालवायला घेतल्या आहेत. ज्याला कुटुंब आहे त्याला भावना आहेत, भावना आहेत म्हणजे परिवार आहे. परिवार नसलेले लोक भावनाशून्य असतात. हिंदू संस्कृती व मोदींच्या नव्या सनातन धर्मात कुटुंब, परिवार, एकत्र कुटुंब पद्धती यास महत्त्व आहे. पण मोदींचा धर्म वेगळा आहे”, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
“आंध्रात व ओडिशातील परिवारवादी पक्ष एखाद्या प्रायव्हेट कंपनीप्रमाणे चालवले जात आहेत व या कंपन्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदी हे परिवारवादासंदर्भात किती ‘ढोंगी’ भूमिका घेत आहेत ते स्पष्ट होते”, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. यासह देशभरात भाजपाने आघाडी केलेल्या घराणेशाही राजकीय पक्षांची यादीच अग्रलेखात देण्यात आली आहे.
शाह पिता-पुत्रावर टोला
“देशातील सर्वाधिक राजकीय घराणी आज भाजपमध्ये आहेत. ती काही भाजपचा विचार पटतोय म्हणून नाही. ईडी, सी.बी.आय.चा धाक दाखवून ही घराणी भाजपने आपल्या तंबूत घेतली आहेत. भाजपचे दात परिवारवादाबाबत जेथच्या तेथे घशात घालता येतील अशी अनेक उदाहरणे देता येतील. अमित शहांचा परिवारवाद भारतीय क्रिकेटमध्ये कोणत्या निकषावर ‘विटीदांडू’ खेळत आहे? हा एखाद्याचा संशोधनाचा विषय आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं थेट अमित शाह व त्यांचे पुत्र जय शाह यांना टोला लगावला आहे.
“भाजपा पक्ष नव्हे, व्यापार केंद्र”
भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. तो भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. राहुल गांधी सांगतात त्याप्रमाणे ही कंपनी ‘हम दो और हमारे दो’पुरतीच मर्यादित बनली. या प्रायव्हेट कंपनीस ना धोरण, ना विचारांचे तोरण! अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून एक व्यापार केंद्रच बनले आहे”, अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.
“महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?…
“शरद पवारांचा हात धरून आपण राजकारणात आलो असे सांगणारे मोदी पुन्हा त्यांच्या परिवारवादावर टीका करतात. पवारांच्या राजकीय परिवारातील प्रफुल्ल पटेल व अजित पवार हे आज मोदींबरोबर आहेत. मोदी-शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही”, असा इशारा ठाकरे गटानं दिला आहे.