मी भाषणात म्हटलं कलंक हा शब्द वापरला त्यात चुकीचं काय बोललो? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना कलंकितच करत आहात. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात का घेता? माझा कलंक शब्द इतका प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं. जनाचं नाही किमान मनाचं भान ठेवा आरोप करताना. मला हे काही बोलताना गंमत वाटत नाही. अफझल खानाची स्वारी असंही म्हटलं होतं. पण त्यामागे माझा हेतू हा होता की ईडी आणि आयकर हे जे काही घराघरात घुसवत आहेत त्याचा अर्थ काय आहे? ते कुटुंब कलंकित होत नाही का? मी एक शब्द वापरला तर इतकी तळपायाची आग मस्तकाला का गेली? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
हे पण वाचा- “पडवळ बाहूचे पसरुनी पंख, दूध पाजणारासी घेतो डंख..”, उद्धव ठाकरेंवर अख्खी कविताच सादर करत भाजपाची टीका
संजय राऊत आणि अनिल परब यांचा कमी छळ सुरु आहे का?
तुम्ही लोकांवर आरोप करता, त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना कलंकित करता. त्यानंतर त्यांना मंत्रिपद देऊन पवित्र करुन घेता, मग त्यांचा उल्लेख कसा करायचा? संजय राऊत आणि अनिल परब यांना काय हे लोक कमी छळत आहेत का? कलंक काय होता ते मी दाखवून दिलं तर त्रास झाला. माझ्या झालेल्या ऑपरेशनवरुन माझी चेष्टा करतात. मी जे काही सहन केलं ते कुणाला भोगावं लागू नये. कुणाच्या कुटुंबावर बोलता, प्रकृतीवर बोलता तो कलंक नाही का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला ‘कलंक’ लावला”, किरीट सोमय्यांची बोचरी टीका
फोडाफोडीचं राजकारण लोकांना पटलेलं नाही
लोकांमध्ये उत्साह दांडगा आहे, लोकांच्या मनात चिडले आहेत. जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे त्या विरोधात लोकांच्या मनात चिड आहे. मला त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मुळीच पटलेलं नाही. लोक मतदानाची वाट बघत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
सरकार दारोदारी जातं पण घरात काय ते त्यांना माहित नाही
मी सोमवारीही पाहिलं आहे की सरकार दारोदारी जातं आहे पण लोकांची कामं होत नाही. सरकार आपल्या दारी जाऊन काही उपयोग नाही. त्यापेक्षा लोकांच्या घरात काय आहे ते पाहिलं पाहिजे. योजनांचा पाठपुरावा करण्याचा कार्यक्रमच मी लोकांना दिला आहे. होऊन जाऊ दे चर्चा असं त्याचं नाव आहे. पाऊस अजूनही म्हणावा तसा पडला नाही. विदर्भात तर पाऊस पडला नाही तर काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. सरकारी योजनांच्या होड्या कुठे सोडायच्या हे विचारायची वेळ आली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मत कुणालाही द्या सरकार माझंच होणार हा जो पायंडा पडला आहे तो घातक आहे. लोकांचा विश्वास उडाला तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.