निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव तसेच पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितले आहे दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काय सुरुवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मी तर असे म्हणेन की दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपले आहे. आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज दिलेला निर्णय अनपेक्षित

“न्याय यंत्रणा आपल्या दबावाखाली कशी येईल, त्यासाठी मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री बोलत आहे. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. देशातील लोकशाही संपलेली आहे. आजचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे ,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवले जात असेल तर…

“मी म्हणालो होतो की जोपर्यंत न्यायालयाकडून निकाल दिला जात नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये. पक्ष कोणाच्या बरोबर आहे, हे केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवले जात असेल तर कोणीही धनाढ्य माणूस निडवून आलेले खासदार, आमदार विकत घेऊन पक्षाच सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हेदेखील मी मगे बोललेलो आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

चोर हा चोरच असतो

“न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त नेमण्याची गरज वाटत आहे. चोराला राज्यमान्यता देणं हे भूषणावह वाटत असेल. मात्र चोर हा चोरच असतो,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिका जिंकायची आहे

“आज आमच्यातील मिंधे गटाची, आणि भाजपाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. मी अनेकदा निवडणूक घ्या, असे म्हणालो आहे. मात्र ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना मिंधे गटाला दिलेले आहे, त्यानुसार कदाचित येत्या महिना किंवा दोन महिन्यांत पालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिका जिंकायची आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray first common election commission decision on bow arrow and shiv sena party prd
Show comments