पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मानहानीप्रकरणी गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात ओम बिर्ला यांनी आदेशही काढले आहेत. राहुल गांधींवर करण्यात आलेल्या या कारवाईवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत टीका करायला सुरुवात केली आहे. ही हुकुमशाहीकडे वाटचाल असल्याची प्रतिक्रिया विरोधकांकडून दिली जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केली आहे.

“हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात”

“राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू”, अशी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया संजय राऊतांनी ट्वीट केली आहे.

“इंदिरा गांधींच्या बाबतीतही असंच घडलं होतं”, अजित पवारांचा राहुल गांधी खासदारकी रद्द प्रकरणी हल्लाबोल!

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी त्यांचा अपमान केल्याचा दावा करण्यता आला होता. यासंदर्भात गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयाने आपला निकाल सुनावला. त्यानुसार राहुल गांधींना दोषी सिद्ध करून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना लागलीच जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र, एखाद्या खासदाराच्या निलंबनासाठी त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन त्याला किमान २ वर्षांची शिक्षा सुनावली जाण्याची अट आहे. या प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांचीशिक्षा सुनावली गेल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader