Sharad Pawar Resign News: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी दिलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आधी शरद पवारांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केल्यानंतर पुढचे जवळपास तीन तास सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांची मनधरणी करत असल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी पुनर्विचार करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा वेळ मागितला असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता ठाकरे गटानं खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे आता या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
“शरद पवारांनी भाषण लिहून आणलं होतं, तसं कधी होत नाही”
“शरद पवारांनी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही”, असा दावा सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे.
“राजीनाम्यामागे ‘हे’ कारण आहे काय?”
राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटामुळे राज्यात कधीही भूकंप होईल असं वातावरण असल्याचा दावाही ठाकरे गटानं केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“दुसरे म्हणजे, अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटन व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो”, असंही अग्रलेखात नमूद केलं आहे.
“पवारांनी राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले”
“राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत व त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले”, अशा शब्दांत ठाकरे गटानं गंभीर दावा केला आहे.