महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्षभरापूर्वीच्या सत्तानाट्याची आठवण करून देणारं नाट्य रविवारी दुपारी घडलं. अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपासोबत जात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण यावेळी ते एकटे गेले नसून त्यांच्यासह ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. ३५ ते ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय वाढून ठेवलंय? यावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळावर आता ठाकरे गटानं मोठा दावा केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाकरी करपल्याचा टोला लगावला आहे.
अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप करत शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे गटानं वर्षभरापूर्वी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता त्याच अजित पवारांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते. या सर्व घडामोडींवर सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं परखड टीका केली आहे.
“खरा पोपट झाला तो देवेंद्र फडणवीसांचा”
दरम्यान, या सगळ्या महानाट्यात खरा पोपट देवेंद्र फडणवीसांचा झाल्याचा टोला ठाकरे गटानं लगावला आहे. “या सगळ्यात ‘पोपट’ झाला आहे तो श्रीमान देवेंद्र फडणवीस यांचा. ‘नाही, नाही. राष्ट्रवादीबरोबर कदापि जाणार नाही. तो भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे’, असे ते मान हलवत, मानेला झटके देत सांगत होते. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन भ्रष्टाचाराचा आरोप आहे व पवारांना सोडणार नाही अशी त्यांची भाषा होती. छगन भुजबळ हे तर जामिनावर आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’च्या अटकेची तलवार आहे. तेसुद्धा हंगामी जामिनावर बाहेर आहेत. तटकरे यांचाही पाय खोलात आहे. सगळ्यांची प्रगतीपुस्तके ही तपास यंत्रणांच्या शेऱ्यांनी भरलेली आहेत. या सगळ्यांनी श्रीमान फडणवीस यांच्या साक्षीने मंत्रीपदाची शपथ घेतली”, असा टोला फडणवीसांना लगावण्यात आला आहे.
“…अन् त्या क्षणापासून अजित पवारांसह ९ आमदार अपात्र ठरलेत”, जयंत पाटलांकडून कायदेशीर पाऊल
“शरद पवार यांना कालपर्यंत जे ‘देव’ मानत होते असे बरेच भक्तगण अजित पवारांसोबत गेले. नरहरी झिरवळ, नीलेश लंके, संजय बनसोडे वगैरे आमदारांची अलीकडची भाषणे याबाबत ऐकण्यासारखी आहेत”, असंही यात म्हटलं आहे.
“मोदी-शाहांना भ्रष्टाचाराचं वावडं नाही, फक्त..”
“पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भोपाळच्या ऐतिहासिक भाषणात सांगितले की, ‘पाटण्यात जमलेल्या विरोधी पक्षांनी २० लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.’ त्यातले अडीच लाख कोटी आता भाजपच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे पुढच्या भाषणात मोदी यांना सुधारित आकडा सांगावा लागेल. मोदी व शहा यांना भ्रष्टाचाराचे वावडे नाही. फक्त तो भाजपात येऊन करा एवढेच त्यांचे म्हणणे आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं मोदींनाही लक्ष्य केलं आहे.
अजित पवारांचं ‘डील?
“अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे; पण या वेळी ‘डील’ पक्के आहे. पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत. लवकरच घटनेनुसार एकनाथ शिंदे व त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल व अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल”, असा दावा ठाकरे गटानं केला आहे.
“अजित पवार शेवटपर्यंत सांगत होते, ‘शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ काय?’ फडणवीस सांगत होते, ‘राष्ट्रवादीशी कधीच युती करणार नाही’. पण दोघांनीही पलटी मारली. त्या पलटीमागे मिंधे गटाचा घात आहे. शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आणखी किती काळ राहतील एवढाच काय तो प्रश्न आहे”, असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.