गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूंनी एकमेकांचे खासदार-आमदार दुसऱ्या बाजूकडे येणार असल्याचे दावे केले जात आहेत. दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पुढील वर्षीच्या निवडणुकांसाठी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवलाय”
एकीकडे संजय राऊतांनी शिवसेनेच्या १९ जागा ठाकरे गटाकडेच असतील, असा दावा केला आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे एखाद्या जागेची अदलाबदल करायला तयार असल्याचं विधान विनायक राऊत यांनी केलं आहे. “उद्धव ठाकरेंनी स्वत: सांगितलंय की शिवसेनेचे १९ खासदार जरी असले, तरी एखाद्या मतदारसंघात आमच्याकडे उमेदवार कमकुवत असेल आणि दुसऱ्याकडे निवडून येण्याच्या क्षमतेचा उमेदवार असेल, तर त्यावर चर्चा होईल आणि जागांची अदलाबदल होईल. एवढा मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरेंनी दाखवला आहे. पण मविआ एकत्र लढून मोठ्या संख्येनं जागा जिंकेल”, अस राऊत म्हणाले.
मविआची जागावाटप बैठक जूनमध्ये?
“४८ जागांमध्ये सन्मानपूर्वक तोडगा निघणार आहे. १६ जागांचा कोणताही पर्याय चर्चेला आलेला नाही. मविआची पुढची चर्चा जून किंवा जुलैमध्ये होईल”, असं विनायक राऊत म्हणाले.
“कीर्तीकरांच्या रुपाच छोटा गौप्यस्फोट”
“आत्ता मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लक्ष ठेवून असणाऱ्या मिटक्या मारत बसलेल्यांचा भ्रमनिरास व्हायला लागला आहे. त्यांनाही कळून चुकलंय की आता मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदार-खासदारांमध्ये मोठा असंतोष आहे. स्वत:च्या
गटाकडे येण्यासाठी ५० खोके किंवा १०० खोके विकासनिधी हे तोंडाला पानं पुसणारं सूत्र होतं. फक्त मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या चार-पाच मंत्र्यांची चलती सोडली, तर बाकी कुणालाही समाधानकारक काम करता येत नाहीये. त्यामुळे त्याचा पहिला छोटासा गौप्यस्फोट खासदार गजानन किर्तीकर यांच्या रुपाने झाला”, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे.
“आता तर कहर झाला”, अजित पवारांचा ‘त्या’ प्रकारावरून सरकारवर हल्लाबोल; विचारला ‘हा’ सवाल!
“गजानन कीर्तीकरांना जरा दट्ट्या मारला म्हणून ते गप्प राहिले. पण येत्या काही दिवसांत शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदारांचा स्फोट येईल. तिथले बरेच जण संपर्कात आहेत. पण ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडले जातील, असं मला अजिबात वाटत नाही. अर्थात यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील”, असंही राऊत म्हणाले.
“गेल्या ८ महिन्यांपासून ते अनेक दावे करत आहेत. पण आता त्यांच्यातलेच काहीजण परत फिरायच्या मार्गावर आहेत. त्यांची काळजी त्यांनी करावी”, असा खोचक सल्लाही विनायक राऊत यांनी शिंदे गटाला दिला.