शिंदे गटच खरी शिवसेना आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. तसंच, शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुका ठाकरे गट कोणत्या चिन्हावर आणि पक्षनावावर लढवणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारलं असता त्यांनी संतापून उत्तर दिलं.
आगामी निवडणुका उबाठा नावाने लढवणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, उबाठा कशाला? माझं सरळ नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. उबाठा काय आहे? मग बाकीच्यांच्या आई-वडिलांची नावंही तुम्ही तशीच लावणार का? आणि उबाठा असेल तर या अन्यायाविरोधात मी उभा ठाकलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवले
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिशादर्शक असतात. ते ऐकले गेले पाहिजेत. मात्र आज राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे ते निर्देश पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही हेच आजच्या निकालाने दाखवून दिलं आहे. त्यांनी अपात्र कुणालाच केलं नाही. आमची घटना ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का केलं नाहीत? शिवसेना कुणाची हे महाराष्ट्रातलं लहान मूलही सांगेल. मात्र निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे. निर्लज्जपणाचा कळस राहुल नार्वेकरांनी गाठला आहे.
राहुल नार्वेकरांनी गैरफायदा घेतला
राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे त्याविरोधात अवमान याचिका बहुदा दाखल करता येणार नाही. त्याचाच त्यांनी गैरफायदा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व शिल्लक राहणार की नाही? हे आता बघावं लागेल. सर्वोच्च न्यायालय स्वतःहून कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यापुढे सर्वोच्च न्यायालयात अशा केसेस आल्या त्यात या लवादाचा निर्णय मानला जाणार का? हे बघावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
२०१८ मधली माझी नियुक्ती त्यांना अमान्य ठरवण्याचा अधिकारच राहुल नार्वेकरांना नाहीच. जर ती घटना मान्य नव्हती तर मग गद्दार कुणाच्या चिन्हावर निवडून आले? जे.पी. नड्डा अध्यक्ष आहेत त्यांना काहीच अधिकार नाही. आज अध्यक्ष जे बोलले आहेत त्याला काही अर्थ नाही. त्यांनी आधी वेळकाढूपणा केला. पहिल्याच दिवशी ते हा निकाल देऊ शकत होते. मात्र त्यांनी उगाचच वेळ काढला आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच निवडणुकीच्या आधी दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे अशीही मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.