महाविकास आघाडी स्थापन करुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणं हा भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी टीका आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच २०२२ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं तेव्हाही मी बदला घेतला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा ऑफर देते आहे असा दावा केला. या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असंही म्हटलं आहे की भाजपा पक्ष फोडते असं तुम्ही का म्हणता? ज्या लोकांची पक्षात घुसमट होते, जीव गुदमरतो त्यांना वाटतं की विकासासाठी आम्ही भाजपासह गेलं पाहिजे. अशावेळी जर बडा नेता भाजपात येत असेल आणि आमची ताकद वाढत असेल तर आम्ही त्यांना नाही कसं म्हणणार? अशोक चव्हाण भाजपात आले आहेत. नांदेडमधला इतका मोठा नेता भाजपात येतो आहे, मोदींचं नेतृत्व स्वीकारतो तर नाही कसं म्हणणार? बरं ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यातून त्यांचं त्यांनी सुटायचं आहे. अशोक चव्हाण एक खटला हायकोर्टात जिंकले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- अजित पवारांना बरोबर घेऊन शरद पवारांचा बदला घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संधी आली की…”
संजय राऊत बेशुद्धच आहेत का?
संजय राऊत असं म्हणाले की दिल्लीतले भाजपाचे काही नेते म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंनी आमच्याबरोबर यावं आपण एकत्र येऊ आमची चूक झाली. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत अजूनही बेशुद्धच आहेत का? संजय राऊत यांना अशी स्वप्नं पडत असतील तर आश्चर्यच आहे. दुसरं असं की आमच्याकडे दिल्लीत असे काही नेते नाहीत जे जाळं घेऊन कुणाच्या मागे जातात. महाराष्ट्राचा काही विषय असेल तर मला विचारलं जातं. मला कुणीही विचारलेलं नाही. उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं का? हे मला कुणीही विचारलेलं नाही. अशा प्रकारचं जाळं टाकण्यात आलं आहे हे स्वप्न जरी संजय राऊत यांना पडलं असलं तरीही मला ती वस्तुस्थिती वाटत नाही.”
उद्धव ठाकरेंवरचा विश्वास उडाला आहे
संजय राऊत असंही म्हणाले की आता उद्धव ठाकरे जर भाजपासह गेले तर ठाकरे कुटुंबावरचा विश्वास उडेल, असं ते म्हणाले, याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या दिवशी महाविकास आघाडीसह जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला त्यादिवशीच लोकांचा विश्वास उडाला. बाळासाहेब ठाकरेंवर जो विश्वास जनतेने टाकला होता तोच विश्वास जनतेने उद्धव ठाकरेंवर टाकला होता. ते महाविकास आघाडी बरोबर गेले तेव्हा ठाकरेंवरचा विश्वास कमी झाला आहे. आता काय बाकी आहे? संजय राऊत जे बोलले ते घडून गेलं आहे. आता उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता कमी झाली आहे.”
मनभेद झालेत आता ते संपवणं कठीण
“मी असंही म्हटलं होतं की मतभेद संपवता येतात, पण मनभेद संपवणं कठीण असतं. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे मोदींवर टीका केली आहे, जे शब्द वापरले आहेत, जे आमच्याशी वागले आहेत. त्यांचं सरकार असताना माझ्यासही सगळ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मनभेद झाले आहेत. आता त्यांना बरोबर घेणं शक्य नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीच्या संग्राम लोकसभेचा या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे म्हटलं आहे.