शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे. न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय उद्या (गुरुवार) यावर निकाल देणार आहे, याबाबतची घोषणा स्वत: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
सत्तासंघर्षावरील निकाल उद्या लागणार असल्याची घोषणा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल, हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी फोनवरून संवाद साधत होते.
सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर भाष्य करताना अनिल देसाई म्हणाले, “सत्तासंघर्षावरील निकाल उद्या देणार असल्याची घोषणा आताच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली आहे. या निर्णयाची संपूर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. भारताची लोकशाही अबाधित ठेवणारा निर्णय उद्या जाहीर होईल. मी सत्तासंघर्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होतो. उद्याही मी दिल्लीत असेन. मला जी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी पार पाडेन.”
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत काय अपेक्षा आहेत? असं विचारलं असता अनिल देसाई पुढे म्हणाले, “अर्थातच अपेक्षा आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाला धरून आणि भारताची लोकशाही समृद्ध करणारा निकाल देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संविधानात ज्या तरतूदी आहेत. त्या तरतुदींप्रमाणेच निर्णय ते देतील, अशी खात्री आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू… हा निर्णय आमच्याच बाजुने लागेल, याची आम्हाला खात्री आहे.”