शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. तसेच, काही ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ते अडचणीतही आल्याचं दिसून आलं आहे. आता पुन्हा एकदा संतोष बांगर चर्चेत आले असून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांनी त्यांना त्यांच्याच एका आव्हानाची आठवण करत “मिशा कधी काढणार?” असा खोचक सवाल केला आहे. त्यामुळे आता यावर संतोष बांगर हे नेमकी काय प्रतिक्रिया देणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
संतोष बांगर यांनी याआधीही एकदा अयोध्या पौळ यांना जाहीर आव्हान दिलं होतं. अयोध्या पौळ यांनी संजय बांगर यांचा उल्लेख गद्दार असा केल्यानंतर त्यांनी टीका करताना आव्हान दिलं होतं. “आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही”, असं बांगर म्हणाले होते.
बांगर यांचं आव्हान आणि पौळ यांचा प्रश्न!
दरम्यान, महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या बाजार समिती निवडणुकांबाबत संतोष बांगर यांनी मोठी घोषणा केल्याचा व्हिडीओ या निवडणूक निकालांनंतर व्हायरल होऊ लागला आहे. “कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. १७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही”, असं आव्हानच संतोष बांगर यांनी दिलं होतं.
दरम्यान, कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल हाती आला असून १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणण्यात संतोष बांगर यांना यश आलं आहे. त्यावरून आता खोचक टीका-टिप्पणी होऊ लागली असून अयोध्या पौळ यांनी एका व्हिडीओ संदेशात त्यावरून टोला लगावला आहे.
“माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस”
“दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर होते. जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हा माझ्या लाडक्या दादुड्यानं पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्यानं पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही. दोन दिवसांपूर्वी तो माझ्यासमोर म्हणाला की १७ पैकी १७ जागांचं पॅनल निवडून नाही आणलं, तर मी माझी मिशी काढतो. संतोष दादुड्या, कधी काढतोयस मिशी? नक्की काढ”, असं अयोध्या पौळ म्हणाल्या आहेत.
“स्वत:च स्वत:च्या राजकीय भवितव्याला भावपूर्ण श्रद्धांजली दिली”
“ज्या ठाकरेंनी, शिवसेनेनं तुला नाव, पद, पैसा, प्रतिष्ठा असं सगळं काही दिलं, त्याच शिवसेनेला त्याच शिवसैनिकांसमोर जर तू चॅलेंज करतोस तर तू स्वत:च्या हातांनी तुझं राजकीय करिअर खराब करून घेतलं आहेस. स्वत:च स्वत:च्या राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहेस”, असंही अयोध्या पौळ व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.