मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली असून सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सवाल केला आहे.
नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “त्यांनी खोके घेतले म्हणून ते खोके देऊ करत आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली. “इतकी भि***झाली असेल सुप्रिया सुळे, तर तिलाही देऊ”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं.
दरम्यान, या मुद्द्यावरून अब्दुल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून सत्तारांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
“अब्दुल सत्तारांवर कारवाई नाही, त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे. तरच उपयोग आहे. कुणीही काहीही बोलू लागलंय. त्याला काही अर्थ आहे का? देवेंद्र फडणवीस हे सगळं कसं सहन करतात? त्यांचे लोक हे कसं सहन करतात? हे खूप अवघड आहे”, असं खैरे म्हणाले आहेत.
“अब्दुल सत्तार थर्डक्लास माणूस”
दरम्यान, सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करतानाच चंद्रकांत खैरेंनी त्यांचा ‘थर्ड क्लास माणूस’ असा उल्लेख केला आहे. “सुप्रिया सुळेंबद्दल ते बोलत असतील तर बरोबर नाही. सुप्रिया सुळे आणि आम्ही १० वर्ष बरोबर होतो. त्या सगळ्यांशी इतक्या चांगल्या पद्धतीने बोलतात, सगळ्यांना आदर देतात. पण हा थर्ड क्लास माणूस त्यांच्याबद्दल असं बोलतो? त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे”, असं ते म्हणाले.
“सगळे म्हणत होते की सत्तारांच्या सभेला एक लाख लोक येतील. मी म्हटलं कुणीही येणार नाही. काल किती लोक होते? खुर्च्या रिकाम्या होत्या. खुर्च्या काढून टाकत होते. हा फेकचंद माणूस आहे. अशा माणसाला मी महत्त्व देत नाही”, असंही खैरे म्हणाले.