राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून हे सरकार न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील सरकार पडणार नाही, याची तजवीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“देवेंद्र फडणवीस हुशार आहेत”

काँग्रेसचे २२ आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे. “देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील.कारण मुख्यंमत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरू असतात”, असं खैरे म्हणाले आहेत.

“निवडणुका कधीही लागू शकतात”

दरम्यान, राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं विधान खैरेंनी यावेळी केलं. “निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रपती राजवटही लागू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे हे राज्यपाल कसं काम करतात. आपले १२ लोक त्यांनी घेतले नाहीत. आपलं कोणतंच काम केलं नाही”, असं खैरे म्हणाले.

काँग्रेसचं खोचक प्रत्युत्तर

चंद्रकांत खैरेंनी हा दावा करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेसलाही लक्ष्य केलं असून त्यावर काँग्रेसकडूनही खोचक प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत खैरेंच्या या दाव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “जे आपलाच पक्ष सत्तेत असून सांभाळू शकले नाहीत, तर दुसऱ्या पक्षाविषयी त्यांनी बोलायचं कारण नाही”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group chandrakant khaire on devendra fadnavis congress pmw