गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये दावे-प्रतिदावे झाल्याचं पाहायला मिळालं. आता न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत राहणार असल्याचं चित्र सध्या दिसू लागलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. राज्याला मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री लाभले असल्याचं राऊत माध्यमांना म्हणाले.
“राज्यात सरकारच अस्तित्वात नाही”
“या राज्यात सरकारच अस्तित्वात नाहीये. म्हणून हा गदारोळ आहे. लाल वादळ येऊन ठेपलंय. किती काळ त्यांना रोखणार तुम्ही. इथे अराजकाची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटेल हे त्यांना माहिती आहे का? ते दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करतायत. हे लोक महाराष्ट्र खतम करायला निघाले आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. मविआनं ठरवलंय की त्याविरोधात रान उठवायचं. आता मविआच्या एकत्र सभा आणि उद्धव ठाकरेंच्याही स्वतंत्र सभा होतील”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
Video: “आमची निरमा पावडर गुजरातहून येते”, भाजपा आमदाराचं विधानपरिषदेत वक्तव्य; म्हणे, “आमच्याकडे येणाऱ्याला…!”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टोला
दरम्याान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावेळी संजय राऊतांनी लक्ष्य केलं. “या राज्याला मुख्यमंत्री नाहीत. या राज्याला मख्ख मंत्री आहेत. मुख्यमंत्री असते तर राज्याची अशी अवस्था झाली नसती. सगळी सूत्र उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करत आहेत. बाकी काही करत नाहीयेत”, असं राऊत म्हणाले.
“राहुल कुलला मुख्यमंत्री नव्हे, उपमुख्यमंत्री वाचवतायत”
दरम्यान, भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी टीका केली. तसेच, या प्रकरणावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “विरोधकांना ईडी, सीबीआय, इओडब्ल्यूच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जातंय. त्याच्यावर बोला. राहुल कुलचं मी ५०० कोटींचं प्रकरण दिलं आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतायत का? भाजपा आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्र्यांचे खासमखास आहेत. भीमा पाटणकर साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण मी दिलं आहे. राहुल कुलला मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री वाचवत आहेत. तुम्ही तुमच्या आसपास काय चाललंय ते पाहा आणि नंतर महाविकास आघाडीच्या कारभारावर बोट दाखवा”, असा खोचक सल्ला संजय राऊतांनी दिला.