महाराष्ट्राच्या मातीत ढोंगाला स्थान नाही. ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब जाहीरपणे सांगायचे अशी आठवण करुन देत शिवसेनेनं म्हणजेच उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवणं हा राष्ट्रद्रोह असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता महान योद्ध्याप्रमाणे देह ठेवला
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. संकटांचे पहाड कोसळले तरी त्या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे त्यांचे नेतृत्व. अनेक वाद, वादळे आणि वावटळी त्यांनी अंगावर घेतल्या व परतवून लावल्या. मनुष्याचे अंतरंग स्पष्टपणे व्यक्त होण्याची वेळ आणि त्याच्या खऱ्या कसोटीचा प्रसंग म्हणजे संकट. त्या वेळी तेजस्वी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीतही तेच घडले. ज्या महाराष्ट्राच्या मातीचे, ‘मराठी’ समाजाचे आपण घटक आहोत, तो महाराष्ट्र, मराठी समाज विस्कळीत झाला आहे. त्याला राजदरबारात पिंमत नाही. त्याला सार्वजनिक मत नाही. त्याला रोज अपमान आणि अवहेलनेस सामोरे जावे लागत आहे. ‘स्वाभिमान’ आणि ‘तेज’ या शब्दांशी त्याचा काही संबंध उरलेला नाही. त्याला रोज लाथाडले जात आहे, हे बाळासाहेबांनी पाहिले, मनावर घेतले. परिणामी मराठी माणूस व महाराष्ट्रावरील अन्यायाविरुद्ध लढायचे आणि त्यासाठी शिवसेनेच्या विचारांची मशाल धडधडत ठेवायची हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण आमरण झटत राहावयाचे असा त्यांनी त्या वेळी निर्धार केला. त्याच निर्धाराने ते लढत राहिले. शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता एका महान योद्ध्याप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतक्या वर्षांनंतरही अभिमानाने सांगितले जाते-
कासिहू की कला जाती
मथुरा मसीत होती
सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी।
शिवाजी महाराज झाले नसते तर काशीची कळा गेली असती व मथुरेत सर्वत्र मशिदी दिसल्या असत्या. जर शिवाजी राजे झाले नसते तर सर्वांची म्हणजे समस्त हिंदूंची सुंता झाली असती, असे कविराज भूषण यांनी लिहून ठेवले. कवी भूषण आपल्या ‘शिवाबावनी’ या काव्यात म्हणतात की, ‘औरंगजेबाने राक्षसाप्रमाणे मथुरेत कत्तल केली. गल्लीगल्लीत उत्तम देवदेवतांच्या मूर्ती खोदून काढल्या. अशा वेळी जर शिवाजीराजे नसते तर चारही वर्णांना आपला धर्म सोडून नमाज पढावा लागला असता.’ हाच शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी बाणा व प्रखर हिंदुत्वाचा विचार शिवसेनाप्रमुख पुढे पुढेच घेऊन गेले,” असं लेखात म्हटलं आहे.
आता शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण…
“महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या पायरीवरचे एक पायपुसणेच झाले होते. मराठी माणसांचा रामा गडी करून ठेवला होता. मोगलांनी आणि इंग्रजांनी आमच्या देशाची लूट केली तशीच लूट मुंबईसह महाराष्ट्राची सुरू होती. त्या वेळी बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली व संपूर्ण महाराष्ट्र त्या विचाराने उजळून निघाला. तो प्रकाश, ते तेज आजही कायम आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले? मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. आता शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण या सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल,” असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
‘डरपोक’ गटास आपले लाचार व मिंधे बनवून त्याच्या समोर सत्तेची हाडके टाकली
“कालचे वर्ष व आजचे वर्ष यात मोठा फरक आहे. भारतीय जनता पक्षाने ‘बदला’ घ्यायचा म्हणून सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फोडली. ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले. अर्थात हा बदला नसून ‘राष्ट्रद्रोह’ आहे. शिवसेना ही प्रखर राष्ट्राभिमानी, राष्ट्रीय बाण्यासाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते व आजही आहेत. त्या संघटनेच्या पाठीत भाजपाने चाळीस खंजीर खुपसून देशद्रोहच केला. हा देशद्रोहासारखाच प्रकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवून ‘बदला’ घेतला म्हणून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटतात त्यास महाराष्ट्रीय मातीचा माणूस कधीच म्हणता येणार नाही. शिवसेनेतील एका ‘डरपोक’ गटास आपले लाचार व मिंधे बनवून त्याच्या समोर सत्तेची हाडके टाकली गेली,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब…
“हा कुणास बदला वगैरे वाटत असेल तर महाराष्ट्राची ११ कोटी जनता या बदल्याचा महासूड घेतल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयाने ते सिद्ध झाले आहे. लोकांची आजही शिवसेनेवर श्रद्धा आहे. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे करीत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट होते. बाळासाहेबांना ज्याप्रमाणे कट्टर विरोधक भेटले त्याप्रमाणे त्यांच्यावर अफाट प्रेम करणारेही असंख्य होते. विरोधकही त्यांच्यावर प्रेमाचा आणि स्तुतीचा वर्षाव करीत. बाळासाहेबांचे व्यक्तित्व होतेच तसे. अशा बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. त्यांनी ढोंगाचा नेहमीच तिरस्कार केला. महाराष्ट्राच्या मातीत ढोंगाला स्थान नाही. ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब जाहीरपणे सांगत,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.
बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते
“भाजपाने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवले व त्या ढोंगालाच ते ‘शिवसेना’ मानत आहेत. आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि फोडून काढले असते. महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी त्यांच्या चाळीस बेइमान खंजिरांसह शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. बाळासाहेब सगळ्यांचे होते; पण त्यांनी बेइमानीस कधीच थारा दिला नाही. लाखो निष्ठावान शिवसैनिक आज बाळासाहेबांचा जयजयकार करतील. त्यांच्या विचारांच्या पेटत्या मशालीसमोर नतमस्तक होतील. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. त्या हिमालयाच्या शिखरावर फक्त भगवाच आहे! जगाच्या इतिहासातील अमर महापुरुषांच्या श्रेणीत बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे. त्यांचे योद्धेपण इतिहासात अधिक तेजाने तळपत राहील,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.