खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, आपण घाबरत नसल्याचंही ते म्हणाले.मात्र, याचवेळी त्यांनी “माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे”, असाही उल्लेख केला. त्यांनी सावरकरांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर भाजपाकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्याबरोबरच आता ठाकरे गटाकडूनही राहुल गांधींना सूचनावजा सल्ला देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी रविवारच्या जाहीर सभेत त्यावरून जाहीर भूमिका घेतल्यानंतर आज सामना अग्रलेखातूनही राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे.
“माझे आडनाव सावरकर नाही, अशी विधाने वारंवार करून…”
“राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे. “माझे आडनाव सावरकर नाही”, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्याबाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“राहुल गांधींना आधी स्वत:च्याच पक्षात…”
“सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील. मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही. राहुल गांधी हे शहीदांच्याच कुटुंबात जन्मास आले. पण वीर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी तितकाच महान त्याग केला. त्या महान त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचा काँग्रेसला इशारा
“राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या गावागावांत वीर सावरकर अनेक स्वरूपात उभे आहेत व ते ताठ कण्याने उभे आहेत”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
“५२ नव्हे तर १५२ कुळं खाली उतरली तरी…”, उद्धव ठाकरेंचं चंद्रशेखर बावनकुळेंवर टीकास्र!
“इंदिरा गांधींचं सदस्यत्व रद्द झालं तेव्हा…”
“इंदिरा गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले तेव्हा देशात एक जबरदस्त चीड निर्माण झाली. तेव्हा आजच्याप्रमाणे वृत्तवाहिन्या, सोशल मीडियाचा वापर नव्हता. तरीही लोकांचा इंदिरा गांधींना पाठिंबा होता व त्याच वातावरणाचा फायदा घेऊन इंदिरा गांधी पुन्हा वाजत गाजत सत्तेवर विराजमान झाल्या. राहुल गांधी हे सर्व नाट्ये कसे घडवणार?”, असा प्रश्नही ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.