“राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत,” अशी टीका ठाकरे गटाने पक्षाचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात केली. तसेच तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा, अशा शब्दांत ठाकरे गटाने टीका केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही”, असा पलटवार बावनकुळे यांनी केला.

हेही वाचा >> “राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची…”; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

“संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.

“कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फडणवीस यांनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली”, असं बावनकुळे म्हणाले.

“उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मा. मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल”, असा टोलाही त्यांनी लगावला.

ठाकरे गटाने काय म्हटलं होतं?

“पंतप्रधान मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे. चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळविले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की, ‘भारताने ऐतिहासिक यश मिळविले आहे. मात्र आता तेवढ्याने समाधान होणार नाही. आता सूर्य-शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल.’ पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. चंद्रानंतर देशाला त्यांनी शुक्रावर, सूर्यावर कदाचित धूमकेतूवरही उतरवून संशोधन करायचे ठरविले आहे. पंतप्रधानांचे लक्ष्य सूर्यावर उतरण्याचे आहे, पण देशातील १४० कोटी जनतेचे लक्ष्य महागाई, बेरोजगारी आहे. अनेकांचे लक्ष्य कांद्याच्या वांध्यावर आहे. चंद्रावर, सूर्यावर यान उतरल्याने या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गती मिळणार असेल तर आनंदी आनंदच आहे. १९६२ पासून भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम नवनवीन भरारी घेत आहे. त्याचे फलित म्हणजे ‘चांद्रयान’ सुखरूप चंद्रावर उतरले,” असं ठाकरे गटाने म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group stray craft on congresss comet bawankules criticism said stomach ache sgk
Show comments