शिवसेना ठाकरे गटाने आज लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने लोकसभेची पहिली यादी जाहीर करत आहोत असं म्हणत त्यांनी १७ नावं जाहीर केली आहेत. मुंबईतल्या चार आणि महाराष्ट्रातल्या इतर १३ जागांची ही यादी आहे. सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र हे सगळं असताना काँग्रेसने उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर
१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी
ही १७ जणांची यादी शिवसेनेने जाहीर केली आहे. मात्र आता यावरुन काँग्रेसचे नेते नाराज झाल्याचं चित्र आहे. संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळा करणाऱ्या अमोल किर्तीकरांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं आहे. तर विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंना आघाडी धर्माची आठवण करुन दिली आहे.
हे पण वाचा- शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसमधील सांगलीच्या जागेचा तिढा कसा सुटला? संजय राऊत म्हणाले…
काय म्हटलं आहे विजय वडेट्टीवार यांनी?
“मविआच्या जागांच्या संदर्भात बैठक झाली आहे. बैठक अंतिम निर्णय व्हायचा असताना, तसंच मविआची चर्चा संपली नसताना उद्धव ठाकरेंना दोन जागांवर उमेदवार घोषित केला आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळला असता तर आनंद झाला असता. तीन पक्ष मिळून निर्णय घ्यायचा असतो. चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट लावणं आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पुनर्विचार केला पाहिजे. तसं घडलं तर खुल्या मनाने निवडणूक पार पाडता आली असती.”
प्रकाश आंबेडकरांबाबत काय म्हणाले वडेट्टीवार?
“प्रकाश आंबेडकरांना पाच जागा देण्याची चर्चा महाविकास आघाडीने केली. एखादी जागा वाढवून देता आली असती. पण प्रकाश आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो भाजपाच्या पथ्यावर पडणारा आहे. एकप्रकारे भाजपाला मदत करणारा तो निर्णय आहे. कारण पुरोगामी मतांचं विभाजन झालं की भाजपाला फायदा होतो. आमची प्रकाश आंबेडकरांना विनंती आहे की त्यांनी निर्णय घेतला आहे तो हुकूमशाहीविरोधातल्या लढ्यात कमकुवत होण्यासाठी घेतला का? त्यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा. आम्ही चर्चेला तयार आहोत.” असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“शिवसेनेने जी यादी जाहीर केली त्याबाबत त्यांनी फेरविचार केला पाहिजे. तसंच प्रकाश आंबेडकरांनीही फेरविचार केला पाहिजे. आघाडी म्हणून पुढे जाणं ही काळाची गरज आहे. आघाडी धर्म हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. दुर्दैवाने आमच्या मित्रांनी ती काळजी घेतलेली नाही हे दिसतं आहे. शिवसेनेची यादी जाहीर झाली. सांगलीची जागा जाहीर करणं किंवा धारावीतला मतदारसंघ जाहीर करणं योग्य नाही. कारण आमची अजून चर्चा सुरु आहे. आमची आघाडी आहे. आघाडी धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे. जे त्यांनी जाहीर केलं आहे त्याबाबत त्यांनी फेरविचार केला पाहिजे.” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जी यादी जाहीर केली ती भूमिका काँग्रेसला पटलेली नाही हे समोर आलं आहे.