नव्या संसद भवनाचे आज नवी दिल्लीत उद्घाटन पार पडले. मात्र, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेसह अन्य विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेवर बाण सोडले आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
“काँग्रेसमध्ये राहून आता उद्धवजींच्या शिवसेनेनेसुद्धा सावरकरांच्या जन्मदिवशी होणाऱ्या उद्घाटनावर बहिष्कार घातला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच. पण, उद्धव ठाकरे आता विचारांनी काँग्रेसवासी होण्याच्या दिशेने चालले आहेत. सावरकर यांच्या जन्मदिवशी सुद्धा मोठ्या सोहळ्याला बहिष्कार घातला आहे याचं भयंकर वेदना आणि दुःख आम्हाला आहे”, अशं आशिष शेलार म्हणाले.
या सोहळ्याला आमंत्रण मिळाले नसल्याचा आरोप केला जातोय. त्यावर आशिष शेलार म्हणाले की, “आमंत्रण सगळ्यांना दिलं. पण असं बोलल्याने मतं मिळतील असं त्यांना वाटतं. लोकशाही धोक्यात आली असेल तर सामनाने कर्नाटकच्या निवडणुका परत घ्या असं म्हणावं. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करावी की, आम्ही कर्नाटक निवडणूक जिंकलो ती हुकुमशाहीने, ठोकशाहीने, थैलीशाहीने जिंकलेलो आहोत. त्यामुळे कर्नाटकचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे कर्नाटकच्या निवडणुका परत घ्या, असं ते म्हणाले तर लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे की नाही हे जनतेला कळेल”, असंही आशिष शेलार म्हणाले.