सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्षांची बैठक बंगळुरुत पार पडली. या पक्षांची एक आघाडी स्थापन झाली आहे. त्या आघाडीचं नाव INDIA असं आहे. मी जे दोन शब्द बोललो त्यात मी विशद केलं आहे की एका पक्षाविरोधात किंवा व्यक्ती विरोधात नाही. तर हुकूमशाहीच्या विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री या पदावर लोक येतात आणि जातात. मात्र जो पायंडा पडतो आहे तो घातक आहे. जे देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी लोक या विरोधात एकत्र आले आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच अजित पवारांचं कौतुकही केलं आहे.
अजित पवार यांची भेट का घेतली?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मी त्यांना दिल्या. सध्या जी काही सत्तेची साठमारी चालली आहे त्यात राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. पाऊस सुरु झाला आहे, पूर स्थिती आहे. शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला होता, आता कदाचित अतिवृष्टीमुळे हवालदिल होईल. मात्र सत्तेची साठमारी सुरु आहे अशात जो मूळ आपला शेतकरी आहे, राज्याचा नागरिक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंतीही मी अजित पवार यांना केली आहे. असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. अजित पवार हे अडीच वर्षे माझ्या बरोबर होते. मला खात्री आहे की सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरु असले तरीही अजित पवारांकडून जनतेला मदत होईल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत परत त्यामुळे हे शक्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हा महाराष्ट्र आहे धृतराष्ट्र नाही
अजित पवारांबाबत सांगत शिवसेनेतून काही लोक बाहेर पडले होते. आता तेच त्यांच्यासह सत्तेत आहेत याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की हे सगळं जनतेला समजतं आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या वाक्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केला. सरकार स्थापन झाल्यावर नांदा सौख्य भरे या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार शरद पवारांना दोन दिवस का भेटले? असा प्रश्न विचारला असता त्यावर आमची काहीही चर्चा झाली नाही असं उत्तरही उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.