Uddhav Thackeray Press Conference in Delhi: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सांगलीत काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक असताना उद्धव ठाकरेंनी थेट ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सांगलीवरून मविआमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व जिंकली. ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा पराभव झाला. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर असून महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील मित्रपक्षांच्या नेतेमंडळींच्या ते भेटीगाठी घेत आहेत. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर त्यांनी उत्तर दिलं. सांगलीतील जागेबाबत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असतानाच मुख्यमंत्रीपदाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. “मी चांगलं काम केलंय असं म्हणणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनाच विचारा की मी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून हवा आहे की नाही? मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. पण जबाबदारीपासून पळणारा मी नाही. त्यामुळे मी ती जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न केला”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सांगली लोकसभा निवडणुकीबाबत विशाल पाटलांचं मोठं विधान (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“सांगलीत जे घडायला नको होतं ते घडलं”

विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला व ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यामुळे नाराजी आहे का? अशी विचारणा केली असता त्यावर उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं. “विशाल पाटील, विश्वजीत कदम, चंद्रहार पाटील ही तरुण मुलं आहेत. मनात डूख धरून ठेवणारा मी नाही. त्यावेळी जे घडायला नको होतं ते घडलं. पण एक गोष्ट नक्की. आम्ही भाजपाचा पराभव केला. भलेही चंद्रहार पराभूत झाला असेल. पण भाजपा जिंकला नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Vishal Patil : काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला? खासदार विशाल पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

“आता विशालही महाविकास आघाडीच्या परिवारात येणार असेल आणि पुढच्या वाटचालीत झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत अशी खात्री त्यानं दिली असेल तर ती गोष्ट मनात धरून राहण्याचं कारण नाही”, असं विधान यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.

विशाल पाटलांप्रमाणेच शिंदे गटाबाबत भूमिका?

मात्र, विशाल पाटलांप्रमाणे शिंदे गटात गेलेल्या आमदारांसाठी मनात गोष्टी न ठेवता वागणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं. “विशाल पाटील, विश्वजीत कदमांनी माझा पक्ष फोडलेला नाही. पण तिकडे गेलेल्या गद्दारांनी माझा पक्ष फोडलाच नाही तर चोरला. पण त्याहीपेक्षा ते सरकारमध्ये राहून महाराष्ट्राला लुटतायत. त्याला क्षमा नाही”, असं ते म्हणाले.

दिल्लीत अचानक भेटीगाठी का?

दरम्यान, यावेळी दिल्लीत अचानक भेटीगाठी का घेत आहात? अशी िचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर उत्तर दिलं. “लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो. माझे खासदार मला घरी येऊन भेटतच असतात. त्यांना इथे भेटायचं होतं. इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीनंतर अधिकृत बैठक झाली नाही. इंडिया आघाडीतील नेत्यांना जमेल तसं भेटावं, पुढील वाटचालीवर साधक-बाधक चर्चा करावी असा विचार होता. महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यासंदर्भात चर्चा करावी असा माझा हेतू होता”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray in delhi on vishal patil win sangli loksabha election pmw