राज्यात एकीकडे सत्तापालट होऊन भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी बसले असून देवेंद्र फडणवीसांनी मात्र उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नव्या सरकारकडून निर्णयांचा आढावा आणि नवे निर्णय घेतले जात असताना उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले असून आज ते शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाले होते राजीनामा देताना?
उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल काय असणार? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेवर उद्धव ठाकरेंनी तेव्हाच आपण पुढे काय करणार याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार ते आज शिवसेना भवनात दाखल झाल्याचं बोललं जात आहे.
“सगळं अनपेक्षित घडतंय. मी आलोच होतो अनपेक्षितपणे. जातोही अनपेक्षितपणे. पण मी कुठेही जात नाहीये. मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. पुन्हा शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. पुन्हा तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेची नवीन वाटचाल करणार आहे. शिवसेना तीच आहे. शिवसेना आपल्यापासून कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपण इथेच आहोत”, असं उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले होते.
पाहा व्हिडीओ –
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम ठरला, ‘या’ दिवशी होणार मतदान!
शिवसेनेसमोरील पेचप्रसंग!
दरम्यान, आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार असून त्यातून पक्षाची पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या आमदारांचा एक मोठा गट फुटल्यामुळे उरलेल्या १४ आमदारांच्या गटासोबत विधानसभेत कशा प्रकारे पक्षाची भूमिका मांडणार, याविषयी शिवसेनेला रणनीती ठरवावी लागणार आहे. सत्तेत असणारा बंडखोर आमदारांचा गट आम्हीच शिवसेना असल्याचं सांगत असताना आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष या गटाला मान्यता देण्याची शक्यता जास्त असताना शिवसेना म्हणून पक्षाची पुढची पावलं काय असणार आहेत? याविषयी उद्धव ठाकरे आणि पक्षातील इतर ज्येष्ठ मंडळी चर्चा करत असल्याचं सांगितलं जात आहे.