शरद पवार यांना पंतप्रधान होण्याचे, तर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडताहेत. इतके घोटाळे करूनही त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, पण येणारा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. जे सोबत असतील त्यांना सोबत घेऊन आणि जे विरोधात जातील त्यांना गाडून शिवसेनेचा भगवा फडकवू, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना उत्तर दिले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नव्हे, कर्जमाफी दिली, त्यातही घोटाळा केला. टूजीचा असो किंवा राष्ट्रकुल स्पर्धेचा, या घोटाळ्यांनीनी देश पोखरून ठेवला आहे. सिंचनातील भ्रष्टाचार तर जगजाहीर झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता गाडण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सरकारांवर टीकास्त्र सोडले.येथील सायन्स कोअर मैदानावर आयोजित ‘निषेध महासभेत’ बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आपल्या सभेलाही गर्दी होते हे इतरांनी उजेडात पहावे, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने रान उठवल्यानंतर घाबरलेल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कर्जमुक्तीची आमची मागणी होती. ती देण्याची या सरकारची औकात नाही. ही कर्जमाफी फसवी आहे, असे आपण ओरडून सांगितले ते खरे ठरले आहे. ‘कॅग’च्या अहवालातून कर्जमाफी घोटाळा बाहेर आहे. सरकारची एकही योजना नाही, ज्यात घोटाळा झालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देश नासवून टाकला आहे, अशी टीका त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा