शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील कोणत्याही घटक पक्षासाठी रामटेकची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने रिपाइंचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांचे रामटेकवरून लढण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने विदर्भातील दहापैकी यवतमाळ-वाशीम, बुलढाणा आणि अमरावती या तीन जागांवर वर्चस्व कायम राखले आहे. रामटेकची जागा शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना फक्त १२ हजारांच्या मताधिक्याने गमवावी लागली होती, परंतु रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे आशीष जयस्वाल गेल्या तीन निवडणुकांपासून घट्ट पकड ठेवून असल्याने या वेळच्या लोकसभा निवडणुकीत याचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली असून ही जागा काँग्रेसकडून खेचून आणण्यात यश मिळण्याची शक्यता पाहता उद्धव ठाकरेंनी अचूक वेळी केलेला दौरा महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या शनिवारी दिवसभर उद्धव ठाकरे रामटेकमध्ये होते. यादरम्यान त्यांनी मतदारांच्या कौलाची, कार्यकर्त्यांच्या कलाची आणि संबंधित राजकीय जाणकारांची मते जाणून घेतली. त्यानंतरच ही जागा शिवसेना सोडणार नाही, असे जाहीर केले.
उद्धव ठाकरे यांची खमकी भूमिका आठवले गटाला नाराज करणारी असल्याने महायुतीतील जागा वाटपावर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आठवले गटाला रामटेकचा गड जिंकण्याचा विश्वास असल्याने खुद्द रामदास आठवले येथून नशीब अजमावण्यास इच्छुक आहेत. त्याला शिवसेनेने आता नकाराचा बडगा दाखविल्याने आठवलेंना पुन्हा दुसरा मतदारसंघ शोधावा लागले. या परिस्थितीत विदर्भातील किती जागा आठवले गट मागतो आणि भाजप-शिवसेना या गटाच्या उमेदवारांसाठी किती जागा सोडणार, हा नवा प्रश्न निर्माण होणार आहे.
शिवसेनाच नव्हे तर भाजपलाही आठवले गटाच्या आग्रहाचा फटका बसण्याची दाट शक्यता असून, भाजप नेत्यांचीही हाती असलेल्या जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याची तयारी नसल्याचे जाणवू लागले आहे. जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यास यातून महायुती भंगाचीही शक्यता नाकारता येत नाही. तूर्त तरी उद्धव ठाकरे यांनी महायुतीची पर्वा न करता पहिली तलवार उंचावली आहे.
रामटेकबाबत उद्धव ठाकरे ठाम
शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील कोणत्याही घटक पक्षासाठी रामटेकची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने रिपाइंचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांचे रामटेकवरून लढण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-09-2013 at 02:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray insistent about the ramtek constituency