राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि बंडखोर शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाच्या भूमिकेबरोबरच निधी वाटपामध्ये भेदभाव केला जायचा असा आरोप बंडखोर आमदारांनी केला आहे. अनेकदा राष्ट्रावदीच्या पराभूत आमदाराच्या मतदारसंघाला निधी दिला गेला मात्र आम्ही आमदार असून आम्हाला पुरेसा निधी देण्यात आला नाही किंवा तो देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याचं अनेक बंडखोर आमदारांनी मुलाखती आणि सभांमधून सांगितलं. मात्र हे आरोप चुकीचे असल्याचे महाविकास आघाडीतील अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देताना सांगितलं. याच प्रकरणावरुन आता थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की पाहा >> Photos: आता बाळासाहेबांवरुन शिवसेना विरुद्ध मनसे? सूचक विधान करत म्हणाले, “बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटतायत किंवा आपल्याला सोडून चाललेत हे जेव्हा चित्र स्पष्ट झालं तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या?” असा प्रश्न राऊत यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, “माझ्या मनात हेच आलं की यातले अनेकजण कितीही काहीही म्हणू दे की मी भेटत नव्हतो पण ते माझ्या कुटुंबासारखे होते,” असं उत्तर दिलं. पुढे उद्धव यांनी थेट निधीवाटपावरुन केल्या जाणाऱ्या आरोपांवर भाष्य केलं.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

“निधी वगैरे म्हणाल तर त्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की जवळपास १२ हजार कोटी एका खात्याला दिलेला. त्यानंतर काही ठिकाणी शेवटच्या क्षणाला मला असं वाटलं तिथे मी निधीवाटपाला स्थगिती दिली होती. आमच्यात बोलणी सुरु होती. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा सुरु होती. निधीवाटपात असमानता असेल तर ती आपण सोडवली पाहिजे. तसं अधिवेशन सुरु असताना अशोक चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता,” असं उद्धव म्हणाले.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”

“सगळ्या आमदारांसोबत मी बैठका पुन्हा सुरु केलेल्या. एका बाजूला माझे आमदार बसायचे एका बाजूला प्रशासन बसायचं. काम कुठे अडलेलं आहे वगैरे चर्चा व्हायची. सगळ्याची चर्चा झाल्यानंतर मी मुख्यमंत्री म्हणून तिथल्या तिथे काही सूचना देत होतो. आमदारांना विचारयचो आणखी काय राहिलं आहे. ते म्हणायचे काही नाही तुम्ही असे भेटू लागला आहात असे भेटत राहा आम्हाला बाकी काही नको,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“माझं हेच म्हणणं होतं जर तुम्हाला हे करायचं होतं तर तुम्ही समोरासमोर येऊन बोलला का नाहीत? डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलला का नाही? म्हणजेच तुमच्या मनात पाप होतं,” असं म्हणत उद्धव यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray interview with sanjay raut part 2 ex cm talks about funding issue scsg