Snehal Jagtap Joining Ajit Pawar NCP : महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश होईल. स्नेहल जगताप यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यावर त्यांची तोफ अवघ्या राज्याने पाहिली. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आता त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात यामुळे भरत गोगावलेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, याप्रकरणी स्नेहल जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

“विधानसभा निवडणुकीत मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत माझ्यावर ९२ हजार लोकांनी विश्वास दाखवला. त्या विश्वासाला डोळ्यांसमोर ठेवून, विकासात्मक दृष्टीकोन ठेवून माझा मतदारसंघ पुन्हा प्रगतीपथावर आणणायचा आहे, त्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं स्नेहल जगताप म्हणाल्या.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सोडण्यामागचे कारण काय? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “निवडणुकीनंतरही आम्ही साहेबांच्या कायम संपर्कात होतो. पक्षनेतृ्त्वावर कोणतीही नाराजी नाही. त्यांच्यावर प्रेम, आदर आहेच. ते कायम राहणार आहे. पण स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”

स्नेहल जगताप यांचा राजकीय प्रवास

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस असलेल्या स्नेहल जगताप ६ मे २०२३ रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आल्या. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाची चांगली बाजू लावून धरली होती. त्याची पावती म्हणून महाडमधून ठाकरेंनी त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ केली. त्यांच्याविरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे भरत गोगावले उभे होते. या निवडणुकीत भरत गोगावले यांचा विजय झाला आणि स्नेहल जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भरत गोगावलेंची डोकेदुखी वाढणार

दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरू शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षात वाद सुरू आहेत. मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात रस्सीखेंच सुरू आहे. त्यातच स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याने भरत गोगावलेंसाठी ही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात दोन तास बैठक झाली. या बैठकीत स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.