उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. तसेच, भाजपाबरोबर पुन्हा युती होणार होती, असा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्न करत होते, असेही दीपक केसरकरांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले की, “भाजपाबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होती. या युतीपासून दूर जाणं उद्धव ठाकरेंना पटलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत नव्हते. तरीही भेट घडवून आणली. उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांशी बोलणी झाली. उद्धव ठाकरेंनी कबूल केलं की, घडलेलं चुकीचं आहे. हे सुधारलं गेलं पाहिजे. तसेच, भाजपाबरोबर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं,” असा दावा दीपक केसरकरांनी केला.
हेही वाचा : “सुजित पाटकरने १०० कोटींचा घोटाळा कसा केला?” किरीट सोमय्यांनी सगळंच सांगितलं
“किरकोळ मतभेद झाले असतील, तर ते मिटले गेले पाहिजेत, हे सुद्धा त्यांना पटत होते. काही वेळ व्यक्तीगत आणि कुटुंबावरील आरोपांमुळे निश्चित दुखावले जाऊ शकतात. पण, दुखावलं गेल्यामुळे एवढा मोठा निर्णय, जो आपल्या पक्षाच्या, विचारांच्या विरोधात आहे. हे कितपत योग्य आहे, हे त्यांना सुद्धा पटलेलं असावं म्हणून त्यांनी याला मान्यता दिली होती. मात्र, ते घडलं नाही. हे का घडलं नाही, हे आमदारांना समजून का सांगितलं नाही,” असा सवाल दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
हेही वाचा : “२०१३ अन् २०१८ साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…”, शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
“आमदारांचं मत हेच होतं की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला तोडायला निघाले आहेत. यांना शिवसेना संपवायची आहे, महाविकास आघाडीतून बाहेर पडा. कारण, पराभूत उमेदवाराला घेऊन यांची लोकं मतदारसंघात यायची आणि सांगायची की हा उद्याचा तुमचा आमदार आहे. मग शिवसेना टिकणार कशी हा मुळात प्रश्न होता. त्यामुळे कोणीही गद्दारी केली नाही,” असं दीपक केसरकरांनी म्हटलं.