केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पुणे दौऱ्यात मोदी@ 20 या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात अमित शाह यांनी युपीए सरकार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले असंही वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं हा सत्याचा विजय झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अमित शाह?
आमच्या युतीला मोठा विजय मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही मिळालं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जे लोक खोटेपणाच्या आधारावर हुंकारत होते त्यांना आता सत्य काय आहे ते समजलं आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी मी भाजपाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी आम्ही निवडणूक युती म्हणून लढलो. स्वतःच्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावून त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली त्यानंतर मुख्यमंत्री हे पद मिळावं म्हणून विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले. त्यांना आज सत्य काय आहे समजलं आहे असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
विश्वासघात करणाऱ्यांना कधीही माफी नसते
निवडणुकीत विजय होणं पराभव होणं या गोष्टी सुरूच असतात. पण जे लोक आपला विश्वासघात करतात त्यांना कधीच माफ करायचं नसतं. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं एका पत्रकाराने विचारलं की, धनुष्यबाण आपल्याला मिळाला.. तेव्हा ते म्हणाले की, धनुष्यबाण आम्हाला मिळाला नाही. तर आम्ही तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गहाण पडला होता तो आम्ही सोडवून आणला. हे त्यांचं भाष्य अत्यंत योग्य होतं असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी तर बाळासाहेबांची विचारधारा आणि शिवसैनिकांसोबतही दगाबाजी केली आहे. आता ‘दूध का दूध और पानी का पानी झालं आहे.’ असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना माफ करतान कामा नये असं यावेळी म्हटलं आहे.
युपीए सरकारवर टीका
२००४ ते २०१४ या कालावधीत देशात सरकारला धोरण लकवा मारला होता. हे सरकार असं होतं की प्रत्येक मंत्री स्वतःला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांना कुणीही पंतप्रधान मानायला तयार नव्हती. दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. लष्कराच्या जवानांना त्रास देत होते. विदेशातही आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना काही सन्मान नव्हता. २०१४ च्या निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिलं. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकाराचं चांगलं परिवर्तन देशात झालं असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.