शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी जळगामधलं राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या सभेला विरोध केला आहे. तसेच गुलाबराव म्हणाले की, आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून लावणारे लोक आहोत. त्यामुळे पाचोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्तात ही सभा पार पाडली जाईल.

Live Updates

Uddhav Thackeray Live News Update : पाचोऱ्यातील उद्धव ठाकरेंच्या सभेतील प्रत्येक घडामोड जाणून घ्या.

20:42 (IST) 23 Apr 2023
"तुमच्याकडे आलेल्या लोकांवर गोमूत्र टाकून शुद्ध करता का?", उद्धव ठाकरेंचा अमित शहांना सवाल

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला अमित शाहांना विचारायचं आहे की, तुम्ही विरोधकांच्या मागे ईडी आणि सीबीआयला लावलं आहे. तुरुंगात जाता की भाजपात येता असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर ठेवता. अशा वेळी काही जण खोक्यासाठी तर काहीजण लाचारी म्हणून भाजपात जातात. आमच्यातील नेत्यांवर तुम्ही धाडी टाकता. तुम्ही त्यांना भ्रष्ट म्हणून धाडी टाकता. मग हीच माणसं तुमच्याकडे आली की तुम्ही गोमूत्र टाकून शुद्ध करून घेता का? तुमच्यात शुद्ध आणि आमच्या भ्रष्ट कसं काय याचं उत्तर द्या.

20:20 (IST) 23 Apr 2023
अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या...", पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंनी मांडली शेतकऱ्यांची व्यथा

पाचोऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका शेतकऱ्याच्या कवीतेच्या काही ओळी बोलून दाखवल्या.

झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या जरा आमच्या बांध्यावरती

अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या जरा आमच्या बांध्यावरती

तुमचं सगळं चाललं असेल ओकेमंधी पण आमच्या कापसाला भाव कधी?

उद्धव ठाकरे म्हणाले की, या शेतकऱ्याला मी मंचावर आणलं नाही कारण, हे सरकार त्याच्यावर कारवाई करू शकतं.

20:13 (IST) 23 Apr 2023
निवडून दिलेले गद्दार, पण निवडून देणारे माझ्यासोबत : उद्धव ठाकरे

निवडून दिलेले आमदार गद्दार झाले, पण निवडून देणारे हात माझ्यासोबत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

20:10 (IST) 23 Apr 2023
"मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही...", उद्धव ठाकरेंचा टोला

पाकिस्तानला पण माहितीय शिवसेना कोणाची आहे. पाचोऱ्याच्या सभेतील गर्दी पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणालाही कळेल शिवसेना कोणाची परंतु मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही.

20:04 (IST) 23 Apr 2023
"जळगाव सुवर्णनगरीत दगड निपजले, म्हणे आमच्यावर...", पाचोऱ्यातून संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला

पाचोऱ्यातील सभेत बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावला. संजय राऊत म्हणाले की, जळगाव ही सुवर्णनगरी आहे. परंतु या सुवर्णनगरीत काही दगड निपजलेत. म्हणे आमच्यावर दगड मारणार, अरे पण त्यासाठी छातीत हिंमत लागते. पण हे गद्दारांचं काम नाही. म्हणे घुसून दाखवा, अरे अजून किती घुसू, इथपर्यंत घुसलोय. मी यांना एवढंच सांगेन शिवसेनेच्या नादाला लागू नका

19:27 (IST) 23 Apr 2023
"पालकमंत्री बालक मंत्र्यांसारखे वागत असतील तर..", सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल, म्हणाल्या...

पालकमंत्री चौकटीत राहण्याचा इशारा देत आहेत. परंतु पालकमंत्र्यांने संविधानिक चौकट पाळायची असते. बालिश विधान करणाऱ्या पालकमंत्र्याला हे कसे कळेल. पालकमंत्री जर बालक मंत्र्यांसारखे वागत असतील तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

18:41 (IST) 23 Apr 2023
पाचोर्‍यातील सभेत शिरणारच, संजय राऊत यांना रोखून दाखविण्याचे शिंदे गटाचे आव्हान

रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. सर्वप्रथम गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना आपल्याविषयी काही बोलल्यास पाचोर्‍यातील सभेत घुसण्याचा इशारा दिला होता. तर, राऊत यांनीही घुसून दाखवाच, असे आव्हान दिले होते. त्यावर शिंदे गटाने सभेत शिरणारच, आम्हाला अडवून दाखवावे, असे आव्हान दिले आहे.

18:40 (IST) 23 Apr 2023
“ज्या गावच्या बाभळी, त्या गावाच्या बोरी”, मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर!

जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट, दोघांकडूनही एकमेकांना आव्हानं-प्रतिआव्हानं दिली जात असताना मनसेनेही उद्धव ठाकरेंच्या सभेला विरोधात करत सभास्थळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच काही मनसे कार्यकर्त्यांनी संजय राऊतांचा पुतळाही जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यावर आता शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचा संपूर्ण बातमी >> मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर!

Uddhav Thackeray Live

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगामधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून लावणारे लोक आहोत, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.