उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे काय झाले, याचे उत्तर द्यावे. सरकारच्या श्वेतपत्रिकेत काहीच नाही. ते केवळ थोतांड होते. चौकशीसाठी आता चितळे समिती स्थापन करण्यात आली. आरोपांची चौकशी कार्यकक्षेत नाही, असे माधवराव चितळे सांगतात. मग पद का घेतले? त्यांनी राजीनामा द्यावा. चितळे आता न्याय देऊ शकणार नाहीत, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे ‘निषेध महासभेत’ बोलताना काढले.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर राहुल गांधींना उत्तर प्रदेशात जाण्यासाठी वेळ असतो, पण भंडाऱ्यातील तीन लहान मुलींच्या बलात्कार आणि हत्येनंतर त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेळ नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी जावेसे वाटत नाही. त्यांनी महाराष्ट्राला काय दिले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘विदर्भ अ‍ॅडव्हान्टेज’मधून विदर्भाचे भले होत असेल तर आपण स्वागत करू, पण भूमिपुत्रांना नोकऱ्या न दिल्यास काय करायचे ते आम्ही बघू, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्रात खासदार ओवेसी यांची मस्ती चालू देणार नाही. आम्ही देशभक्त मुसलमानांसोबत आहोत, पण ओवेसींसारख्यांना पाकिस्तानात पाठवायला हवे, असे ते म्हणाले. हिंदूंनी आपली वज्रमूठ दाखवून द्यावी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ालाही स्पर्श केला. या सभेला शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, दिवाकर रावते, खासदार आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, भावना गवळी, मुंबईचे महापौर सुनील प्रभू, अभिनेते आदेश बांदेकर, आमदार अभिजीत अडसूळ, संजय राठोड, विजयराज शिंदे, माजी खासदार अनंत गुढे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा