खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत राहुल गांधी लोकांशी संवाद साधत असून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या या यात्रेत राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशीदेखील संवाद साधत आहेत. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीदेखील या यात्रेत सहभागी होत आहेत. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. असे असतानाच या यात्रेमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार का असे विचारले जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे गटातील नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे, असे दानवे म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> औरंगाबादकडे ठाकरे गटाचे विशेष लक्ष; अब्दुल सत्तार, संदिपान भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे घेणार मेळावे
“पक्ष म्हणून जी भूमिका ठरेल, त्या भूमिकेशी आम्ही सहमत असू. मला वाटतं उद्धव ठाकरे आगामी काळात या यात्रेत सहभाग होऊ शकतील. काँग्रेसचे नेतृत्व देशभक्ती, भारत जोडण्याचा उद्देश ठेवून मोहीम राबवत असेल, तर या यात्रेत सहभागी होण्यात काहीही अडचण नाही,” असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रुपात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे या यात्रेत शिवसेना सहभागी होणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यानंतर आता दानवे यांनी दिलेल्या माहितीनंतर उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत जोडो यात्रा सध्या तेलंगाणामध्ये असून येत्या ७ नोव्हेंबर रोजी यात्रेचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा १६ दिवस मुक्काम असणार आहे. या दरम्यान ३८३ कि. मी. पदयात्रा काढण्यात येणार आहे.