Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis Rahul Narwekar: विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतरही विरोधकांकडून सातत्याने निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. यादरम्यान आज अचानक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. या भेटीची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीवेळी उपस्थित असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी या भेटीमध्ये नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली आहे. ते टीव्ही९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणीस यांच्या भेटीबद्दल बोलताना प्रभू म्हणाले की, “महाराष्ट्राचं राजकारण एक सुसंस्कृत राजकारण आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांकडे सुसंस्कृत राजकारणी म्हणून लोक बघतात. मधल्या काळात वातावरण खराब झालं होतं ते महाराष्ट्रासाठी शोभनीय नव्हतं. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन होतं. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख नागपूर येथे अधिवेशनात हजर होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच विरोधी पक्ष म्हणून आमची संख्या जरी कमी असली, तरीही जेव्हा जेव्हा सरकारला जे काही सांगण्याची वेळ येईल ते स्पष्टपणे आम्ही सांगू, हे देखील आम्ही तितक्याच तत्परतेने मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे”, असेही प्रभू म्हणाले.
“उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद उत्तम होता, विधानसभेच्या आवारातील ही भेट होती. या भेटीमध्ये विधानसभेचं कामकाज, सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामासंबंधीच्या चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झालं. राजकारणाव्यतिरिक्त येणार्या काळासाठी शुभेच्छा देणे हा एकमेव उद्देश होता”, असेही प्रभू म्हणाले.
हेही वाचा>> उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा झाली? विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही ठरलं का? राहुल नार्वेकरांचं मोठं भाष्य
शिवसेना पक्षातील फूट आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणता महत्वाचा निर्णय देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीदेखील उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना प्रभू यांनी सांगितेल की, “मागील घटनाबाह्य सरकारसंबंधीचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. पण कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार जी सुनावणी झाली आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय एकांगी होता. हे आम्ही तोंडावर सांगितलं”.
पुढे बोलताना प्रभू म्हणाले , “पण विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यांना बहुमत मिळालं. बहुमत कशा पद्धतीने मिळालं हा भाग वेगळा आहे. पण आज सत्तेत बसल्यानंतर आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना भेटणं आणि मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आम्ही तेथे गेलो होतो आणि आम्ही त्यांचं अभिनंदन केलं”.