शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर आधी शिवसेना नेत्यांवर आरोप केल्याचा आणि नंतर त्याच नेत्यांना आपल्यासोबत घेऊन पुण्यवान केल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरींचा उल्लेख केला. गडकरी म्हणाले होते की आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे, असं म्हणत ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला. ते बुधवारी (२७ जुलै) सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी म्हणाले होते की, ‘आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. लोकांना आमच्या पक्षात घेऊन आम्ही पुण्यवान करतो.’ आरोप असणारे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार आहे? शिवसेनेच्या ज्या नेत्यांना २४ तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले. नवनव्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही.”

उद्धव ठाकरे संजय राऊतांना म्हणाले, “तुम्हालाही अटक केलं जाईल”

यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना तुरुंगात जाण्याच्या मिळणाऱ्या इशाऱ्यांवरही भाष्य केलं. “तुमच्यावर आरोप होत आहेत. तुम्हालाही अटक केलं जाईल असं वातावरण निर्माण केलं जातंय. याला काय म्हणायचं? असं होऊनही तुम्ही हटत नाही. तुम्ही आत्ता जरी गेले तरी तुम्ही पुण्यवान व्हाल. सगळे पुण्यात्मे तिकडे जातील,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“बाळासाहेब ठाकरे सांगायचे तो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. शेवटी प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो,” असंही त्यांनी नमूद केलं.

“दडपशाहीविरोधात लढण्यासाठी इच्छाशक्ती फार महत्त्वाची”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “विरोधकांना दडपशाहीविरोधात लढण्यासाठी इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. आणीबाणीच्या काळात आपल्या देशाने अनुभव घेतला होता. त्यावेळी जनता पक्ष स्थापन झाला. जनता पक्षाकडे देशभरात प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग एजंट देखील नव्हते, तरी देखील लोकांनी भरभरून मतं दिली. त्यावेळी साहित्यिकांसह सर्वच स्तरातील लोकांनी बाहेर पडून आवाज उठवला. जनता पक्ष सत्तेवर आला आणि आपआपसात भांडून स्वतःचं सरकार स्वतःच पाडून टाकलं. त्यामुळे इच्छाशक्ती पाहिजे.”

“कुणीही पदांवरून भांडणार नाही असं ठरवलं पाहिजे”

“एकत्र यायचं झालं तर कुणीही पदांवरून भांडणार नाही असं ठरवलं पाहिजे. आत्ता यांनी हुकुमशाहीच आणली आहे, असं मी म्हणत नाही. मात्र, ज्या दिशेने पावलं पडत आहेत ती बरी नाहीत, असं अनेकजणांचं मत आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

तुमच्याकडे दडपशाहीविरोधात लढण्याची इच्छाशक्ती आहे का? उद्धव ठाकरे म्हणाले…

दडपशाहीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे दडपशाहीविरोधात लढण्याची इच्छाशक्ती आहेच. मात्र, प्रश्न माझ्या एकट्याचा नाही. देशातील सर्व राज्यांनी एकत्र व्हायला हवं. भाजपाने देखील अधिक शत्रू न वाढवता. आरोग्यदायी राजकारण केलं पाहिजे. आम्ही तर मित्रच होतो, २५-३० वर्षे सोबतीच होतो, तरी २०१४ मध्ये त्यांनी युती तोडली होती. कारणं काहीच नव्हती. तेव्हाही आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही.”

“सरत्या काळात बाळासाहेबांना दिलेलं माझं ते वचन आजही अर्धवट”

“२०१४ मध्ये भाजपाने शेवटच्या क्षणात युती तोडली होती. कशासाठी? आम्ही तर तुमचे मित्रच होतो. आम्ही तेव्हा तरी काय मागत होतो? मी आजही शिवसेनेसाठी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का मागत होतो? त्याचं कारण मी सरत्या काळात शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. तसं बघितलं तर माझं ते वचन आजही अर्धवट आहे. कारण तेव्हा मी मुख्यमंत्री होईन असं बोललो नव्हतो. मला ते आव्हान स्विकारावं लागलं होतं,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता त्यांच्याच पुत्राला गादीवरून खाली उतरवलं”

“या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या. म्हणून मला तो निर्णय घ्यावा लागला. फुटिरांचा मी मुख्यमंत्री झालो असा आक्षेप असेल तर आता मी होऊन गेलो, मग तुमची अडचण काय आहे? म्हणून तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावत आहात त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं,” असा आरोप ठाकरेंनी केला.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर दीपाली सय्यदांची संजय राऊतांकडे मागणी; म्हणाल्या, “त्यांनी एकनाथ शिंदे…”

“माझ्याच समोर त्यांनी राजीनामा दिला होता”

“त्यांचा एका भरसभेत राजीनामा दिल्याची व्हिडीओ आहे. त्यात ते भाजपा शिवसैनिकांवर कसा अत्याचार करतो आहे हे सांगत आहेत. माझ्याच समोर त्यांनी राजीनामा दिला होता,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray mention nitin gadkari and criticize bjp over ed politics pbs