राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेते आणि मंत्र्यांवर ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांची कारवाई सुरू असताना त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून भाजपावर टीका केली जात आहे. जे नेते भाजपात जातात, त्यांच्यामागे असा ससेमिरा लागत नसल्याची विधानं भाजपामध्ये गेलेल्याच काही नेत्यांनी केल्यामुळे याची चर्चा जास्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या बीकेसीमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपारवर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, त्यांनी यावेळी चौफेर फटकेबाजी करत खोचक टोले देखील लगावले आहेत.
“इतरांचं हिंदुत्व घंटाधारी आहे”
“खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, तो हल्ली देशाची दिशा भरकटवत आहे. मी मध्ये बोललो होतो की शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. ते म्हणाले मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन आपण पुढे जातोय. आपलं हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचं घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
“अडीच वर्षांपूर्वी गध्याला सोडलं!”
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाबाबत बोलताना गध्याला अडीच वर्षांपूर्वी सोडल्याचा खोचक उल्लेख केला. “खरंय. आमचं हिंदुत्व गधाधारी होतं. पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत”, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
“उद्या दाऊदलाही भाजपात घेतील”
दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला. “आता हे दाऊदच्या मागे चाललेत. दाऊद उद्या म्हणााला मी भाजपात येतो, तर उद्या मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. त्याला सांगत असतील बघ, ईडी वगैरे मागे लागतं. आमच्यासोबत ये, तुला मंत्री बनवतो. उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील आणि सांगतील दाऊद आमचा गुणाचा पुतळा आहे”, असा टोमणा उद्धव ठाकरेंना मारला!