सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यापासून राज्यात राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधात असणाऱ्या ठाकरे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपाकडून यासंदर्भात शिंदे गटाची बाजू घेत सातत्याने भूमिका मांडली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायद्यानुसार निर्णय होईल असं म्हणत आहेत. या सर्व गोंधळात पोपट मेल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकीकडे विरोधकांनी शिंदे सरकारचा पोपट मेल्याची टीका केली असताना फडणवीसांनी त्यावरून टोला लगावला. त्यावर आता पुन्हा संजय राऊतांनी सूचक विधान केलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. “मी यावर काहीही बोलू शकत नाही. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. पण एक अभ्यासक, एक वकील आणि २५ वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरीही ते अशा गोष्टी बोलत आहेत. कारण साहजिकच त्यांना कार्यकर्त्यांना दाखवावं लागणार की आशा जिवंत आहेत”, असं फडणवीस म्हणाले होते.
“१६ आमदार अपात्र ठरणार नाहीत”; अजित पवारांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “पोपट…”
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी टोला लगावला आहे. “सर्वोच्च न्यायालयानं मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलंय. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचंय. मला वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतीशहाणे किंवा मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीसच असं म्हणत असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील”, असा टोला राऊतांनी लगावला.
“फडणवीसांची काहीतरी मजबुरी दिसतेय”
“देवेंद्र फडणवीसांना वकिलीचं ज्ञान आहे, त्यांना कायदा कळतो. त्यांना प्रशासन कळतं. त्यांना राजकारण माहिती आहे. त्यांना पडद्यामागे काय चाललंय हे माहिती आहे. ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. तरी ते अशी वक्तव्य करतायत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी दिसतेय”, असं संजय राऊत म्हणाले.